उमेश पाल हत्याकांड ; योगीचा माफियांना थेट इशारा!

25 Feb 2023 15:30:04
yogi adityanath


लखनऊ : उत्तर प्रदेशातील विधानसभेत उमेश पाल यांच्या हत्येप्रकरणी अखिलेश यांनी राज्य सरकारकडे उत्तर मागितले आणि सीएम योगींनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, 'आम्ही माफियांच्या विरोधात आहोत, त्यांना मातीत मिसळू.आम्ही कोणत्याही माफियाला सोडणार नाही. तसेच योगी म्हणाले की, सपाने अतिक अहमदला प्रोत्साहन दिले. गुन्हेगाराला खासदार करा आणि मग तमाशा करा, अशी टीका ही योगीनी अखिलेश यादव यांच्यावर केली. तसेच राजू पाल हत्याकांडात अतिक अहमद दोषी असून, सपाने त्याला आमदार करून पदोन्नती दिली.


राजू पाल ह्त्याकांडातील मुख्य साक्षीदार उमेश पाल कोण आहेत?

अलाहाबाद पश्चिमेतील बसपाचे आमदार असलेले राजू पाल यांची २५ जानेवारी २००५ रोजी सुलेमासराय येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांची पत्नी पूजा पाल या कौशांबीच्या चैल मतदारसंघातून सपाच्या आमदार आहेत. राजू पाल हत्येप्रकरणी माजी खासदार अतिक अहमद आणि त्यांचा धाकटा भाऊ माजी आमदार खालिद अझीम उर्फ ​​अश्रफ यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. उमेश पाल हा घटनेचा मुख्य साक्षीदार होता. तो राजू पाल यांच्या पत्नी पूजा पालच्या मावशीचा मुलगा आहे.

राजू पाल खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे होता. यामध्ये उमेश पाल हा मुख्य साक्षीदार होता. त्यामुळेच त्यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या होत्या. राजू पाल यांच्या पत्नी आमदार पूजा पाल यांनीही साक्ष प्रभावित करण्यासाठी उमेश पालची हत्या केली असावी, अशी भीती अनेकदा व्यक्त केली होती. उमेश पाल यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचेही सांगितले होते. २४ फेब्रुवारी रोजी उमेश पाल यांची प्रयागराज येते गोळी घालून हत्या करण्यात आली. उमेश पाल यांच्या मृतदेहाचे प्रयागराज येथील एसआरएन रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत असून, यामध्ये अनेक गोळ्या शरीरात अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


Powered By Sangraha 9.0