मुंबईकरांना झाले विविध औषधी वनस्पती तसेच फुल झाडांचे प्रदर्शन

24 Feb 2023 19:36:45

flower exhibition
मुंबई (समृद्धी ढमाले) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र निसर्ग उद्यान यांच्या वतीने झाडे, फुले आणि औषधी वनस्पती प्रदर्शनाचा आज पहिला दिवस होता. महाराष्ट्र निसर्ग उद्यान धारावी येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असुन हंगामी फुलझाडांच्या ४५ , कुंड्यांमध्ये वाढलेल्या शोभिवंत विभागामध्ये ४८ , कुंड्यांमध्ये वाढणाऱ्या फुलझाडांच्या ५२ , औषधी व सुगंधी वनस्पतींच्या ५०, गुलाबाच्या २९ प्रजाती आणि बोन्सायच्या ३० प्रजातींचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनाला पहिल्या दिवशी दोन शाळांतील ३५० विद्यार्थी तर इतर प्रदर्शन पहायला आलेल्यांची संख्येचा आकडा हजारांच्या पार गेला आहे. २५० हुन अधिक प्रजाती असलेल्या या प्रदर्शनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
"मुंबईतील मीठी नदीच्या काठावर असलेल्या आणि पूर्वीच्या डम्पिंग ग्राउंड वर स्थित सुमारे ३७ एकरमध्ये पसरलेल्या महाराष्ट्र निसर्ग उद्यानात, निसर्ग संवर्धनाबाबत महत्त्व समजावून त्याबाबत जनजागृती करण्यासाठी एमएमआरडीएचा हा प्रयत्न आहे. समग्र प्रदर्शनाचे हे पहिले वर्ष असून या प्रदर्शनास नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी" असे मत एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी व्यक्त केले आहे. हे प्रदर्शन २४, २५ आणि २६ फेब्रुवारी असे तीन दिवस खुले असणार असून प्रदर्शनासाठी प्रवेश विनामूल्य आहे.




कुंड्यामध्ये वाढलेल्या फळभाज्या पालेभाज्या व विदेशी वनस्पती, फळझाडे, हंगामी फुलझाडे, शोभिवंत पानाची झाडे, सुगंधी व औषधी वनस्पती, गुलाबाची रोपे यांचे शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत, तसेच मुंबई बटुवृक्ष (बोन्साय) या प्रजातीच्या झाडांचे देखील समावेश असणार आहे. लहान मुलांसाठी आकर्षक असे फुलांनी सजवलेलं हत्ती आणि मोर असणार आहेत. या प्रदर्शनात सनटेक, गोदरेज, हिरानंदानी, BARC, मुंबई रोझ सोसायटी, इंडियन बोन्साय सोसायटी, टाटा पॉवर, भारत डायमंड बोर्स, मुंबई महानगरपालिका, सोमय्या महाविद्यालय अशा संस्थांनी भाग घेतला आहे. या प्रदर्शनासोबतच आयोजित होणा-या विक्री दालनांमध्ये विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बियाणे, खते उपलब्ध असणार आहेत.
Powered By Sangraha 9.0