अभिनयसंपन्न ‘अथर्व’

24 Feb 2023 20:08:57
 
Atharva Jayesh wagal
 
ना कलेचा वारसा, ना गिरवले अभिनयाचे धडे तरीही... कलाक्षेत्रात झेपावणारा बालकलाकार अथर्व जयेश वगळ या जिज्ञासू बालकलाकाराविषयी...
  
‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ...’ त्याप्रमाणे बालवयापासून केवळ टीव्हीवरील मालिका आणि चित्रपट पाहून अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवणार्‍या अथर्वचा जन्म दि. 7 जून, 2009 रोजी ठाण्यात झाला. ठाण्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मोठ्या शिशुमध्ये शिकत असतानाच त्याने आपले पहिले पाऊल अभिनयाच्या क्षेत्रात टाकले. तेव्हापासून शिक्षण संभाळून कलाक्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात अथर्व अपूर्व योगदान देत आहे. घरात अभिनयाचा वारसा नसताना, किंबहुना अभिनयाचे कसलेच धडे न घेताही अथर्वची अभिनय क्षेत्रात यशस्वी घोडदौड सुरू आहे.
 
लहानपणापासून ’जिज्ञासू’ स्वभावाच्या अथर्वला, सतत काही ना काही नवीन शोधण्याचे व करण्याचे कुतूहल होते. त्यामुळे खासगी सेवेत बड्या हुद्द्यावर कार्यरत असणारे त्याचे आई-वडील अथर्वला त्याच्या विविध समाजकार्यात व जिज्ञासू स्वभावाला प्रोत्साहन देत आलेत. अथर्वनेही आपल्या पालकांचा विश्वास सार्थ ठरवत आपल्यातील अंगभूत अभिनयाच्या जोरावर कलेच्या प्रांतातील अनेक शिखरे पादाक्रांत करीत आहे. लहानपणापासून अभिनयासोबत अथर्वने विविध रिल्स बनविणे, स्वतःचं ’एडिटिंग’ करणे, नृत्य करणे, क्रिकेट, बुद्धिबळ, फुटबॉल, हॉलीबॉल खेळणे, पोहणे, सायकल चालवणे, बॅडमिंटन खेळणे, चित्रकला आदी छंद जोपासले आहेत. साडेतीन वर्षांचा असताना अथर्वने आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात ‘स्टार प्रवाह’वर प्रसारित झालेल्या ’जयोस्तुते’ या मालिकेपासून केली. तेव्हा, मालिकेत त्याचे लहानवयातील कलागुण पाहून ’विशेष’ एपिसोड’ साठी त्याची निवड झाली. त्यानंतर ‘राष्ट्रीय पुरस्कार’ विजेते भीमराव मुंडे, अमेय मोरे यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम करून ’जयोस्तुते’ मालिकेचे नऊपेक्षा जास्त विशेष एपिसोड’ केले.
 
या अपूर्व यशानंतर अथर्वने मागे वळून पाहिलेच नाही. अनेक नावाजलेल्या मराठी, हिंदी टीव्ही वाहिन्यांच्या मालिकांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. ज्यामध्ये ‘लक्ष्य’, ‘अस्मिता’, ‘प्रेम हे’, ‘नवे लक्ष्य’, ‘आहट’, ‘सुपर व्हीलाज’, ‘सावधान इंडिया’, ‘क्राईम पेट्रोल’, ‘सीआयडी’ व इतर अनेक नावाजलेल्या मालिकांचा समावेश आहे. याशिवाय, विविध टीव्ही व प्रिंट मीडियातील जाहिराती, टीव्ही शो प्रोमोज, फॅशन शो, म्युझिक अल्बम आणि अनेक मराठी व हिंदी चित्रपटामध्ये बालकलाकाराच्या भूमिका साकारल्या. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ’धर्मवीर मु. पोस्ट ठाणे’ या चित्रपटातही अथर्वने साकारलेली मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची ’बालपणीची’ भूमिका प्रचंड गाजली.
 
स्वभावाने मनमिळाऊ, जिज्ञासू असलेला अथर्व नेहमीच काहीतरी नवीन करण्यासाठी तत्पर असतो. कलेसोबत सामाजिक कार्यातही त्याला रूची आहे. वाढते प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी 2017 पासून अथर्व ’प्लास्टिक बंद’ जनजागृती मोहीम यशस्वीरित्या राबवत आहे. त्याकरिता तो कधी गाण्याच्या माध्यमातून तर कधी ‘शॉर्ट फिल्म’च्या माध्यमातून, तर कधी प्रसिद्ध कलाकारांसोबत व्हिडिओ संदेशाद्वारे समाजात कार्यरत असतो. देशातील वाढती ’बालमजुरी’ रोखण्यासाठी सुद्धा त्याने पुढाकार घेतला असून त्याकरिता सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांच्यासमवेत काम केले आहे. ‘कोविड’ काळातसुद्धा त्याने स्वतः गाणं व ‘शॉर्ट फिल्म’बनवून ‘कोविड’विषयी जनजागृती केली होती. ‘कोविड’मुळे दीड वर्ष बंद असलेले ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी थिएटर अर्थवच्या पाठपुरावा आणि प्रयत्नामुळेच सुरू झाले होते.
 
अभिनय क्षेत्रातील यशोगाथा सातत्याने उंचावत असताना अथर्वने सामाजिक जनजागृती केल्याने आतापर्यंत त्याला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘झी मराठी’चा पुरस्कार, ठाणे महापालिकेतर्फे विशेष पुरस्कार त्याला मिळाले असून, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अन्य मंत्र्यांसह विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदींनी सुद्धा अथर्वच्या ’प्लास्टिक बंद जनजागृती’ मोहिमेचे कौतुक करून शुभेच्छा संदेश पाठवल्याचे अथर्व सांगतो.
 
आपल्या समवयीन पिढीला संदेश देताना, देशातील वाढते प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करण्यास तो सांगतो. आपण जर एक मोबाईल खिशात ठेवू शकतो, तर एक कापडी पिशवी का बरं ठेवू शकत नाही? असा प्रबोधनात्मक सवाल करून अथर्व प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा र्‍हास होत असल्याकडे लक्ष वेधून, ‘सिंगल युज प्लास्टिक’व प्लास्टिक पिशव्या वापरणे कायमचे बंद करा, असे उपदेश समाजाला करतो.
 
भविष्यात ‘एमबीए’ किंवा अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण पूर्ण करण्याचा मानस व्यक्त करणार्‍या अथर्वला सर्वप्रथम एक चांगला माणूस बनण्यासोबतच सर्वांना मदत करणारा उत्तम ’अभिनेता’ बनायचे आहे, जेणेकरून आपल्या शाळेचे, आई-वडिलांचे त्याचबरोबर कर्मभूमी ’ठाणे’ शहराचे नाव त्याला मोठे करायचे आहे. अशा या चिमुकल्या कलावंताला त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
Powered By Sangraha 9.0