चीनमधील जनआक्रोश

22 Feb 2023 20:32:50
White Paper' protest in china

कोरोनाने सगळ्या जगात हाहाकार माजवला होता. चीन तर अजूनही त्यातून सावरलेला दिसत नाही. कोरोनाचे पडसाद आजही चीनच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणात उमटताना दिसतात. त्याचाच एक भाग म्हणजे ‘आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटने’ने चीन सरकारकडे १०० व्यक्तींच्या सुटकेची मागणी केली आहे. या १०० जणांवर यापूर्वी कधीही कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. आताही या १०० जणांना अटका का झाली, तर त्यांनी खून, चोरी, बलात्कार अपहरण खंडणी कोणत्याही प्रकारचे भेदभावपूर्ण वर्तन वगैरेपैकी एक गुन्हा केला आहे का? तर नाही, या सगळ्यांचा गुन्हा एकच की हे सगळे जण ‘व्हाईट पेपर’ आंदोलनामध्ये सामील झाले होते. काय आहे हे ‘व्हाईट पेपर’ आंदोलन?

दि. २४ नोव्हेंबर, २०२२ रोजी चीनच्या शिनजियांग प्रांताची राजधानी उरूमकी येथे रात्री ७:५४ वाजता एका इमारतीच्या १५व्या मजल्यावर आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. आगीपासून वाचण्यासाठी लोक जीवाच्या आकांताने इमारतीच्या बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, जीव वाचवण्यासाठी बाहेर पडणार्‍या या लोकांना अत्यंत निर्दयतने इमारतीमध्ये पुन्हा जबदरस्तीने ढकलण्यात आले. त्यांनी बाहेर येऊच नये, असा प्रयत्न केला गेला. हे असे करणारे कोण होते, तर चिनी प्रशासन! कारण, त्यावेळी चीनमध्ये कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’ सुरू होते. घराबाहेर नागरिकांना पडण्याची बंदी होती. प्रशासकीय अधिकार्‍यांनी निर्णय घेतला की, ‘शून्य कोविड’ परिस्थितीसाठी आग लागलेल्या इमारतीमधील लोकांनी घराबाहेर पडूच नये. घराबाहेर पडू नका.

अग्निशमन दलाच्या गाड्या येतील. असाल तिथेच राहा, असे प्रशासनाने लोकांना सांगितले. पण, ‘लॉकडाऊन’ आणि कठोर नियमनामुळे अग्निनशमनच्या गाड्याही पाच तास उशिराने आल्या. तोपर्यंत जबरदस्तीने अपार्टमेंटमध्ये कोंडलेल्या लोकांपैकी दहा जण धुराने गुदमरून मेले, तर काही गंभीर जखमीही झाले. उरूमकीमध्ये आगीत हे निष्पाप लोक बळी गेले. ही घटना जशीच्या तशी सोशल मीडियाच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचली. या सगळ्यामुळे चीनमधील लोक संतप्त झाले. शांघाय आणि चीनमधील सर्वच प्रमुख शहरात लोक रस्त्यावर उतरले. चिनी प्रशासनाविरोधात सांगण्यासारखे आणि शब्दात न मांडू शकणारा आक्रोश सर्वत्र होता. या सगळ्यांचे प्रतीक म्हणून लोक पांढरा म्हणजे व्हाईट कोरा कागद घेऊन रस्त्यावर उतरले. हजारो लोक चीनच्या शहराशहरांमध्ये पांढरा कागद घेऊन संतप्त चेहर्‍यांनी, डोळ्यात अश्रू आणून आंदोलन करत होते. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या विरोधात जनभावना तीव्र होताना स्पष्ट दिसत होत्या.

या आंदोलनानंतर काही दिवस शांतता होती. मात्र, काही दिवसांनी चीनमध्ये एक सत्र सुरू झाले. त्याअंतर्गत ‘व्हाईट पेपर’ आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या व्यक्ती अचानक गायब होऊ लागल्या. आंदोलनकर्त्या हजारो लोकांपैकी केवळ १०० गायब झालेल्या या व्यक्ती कोण आहेत तर? या १०० व्यक्ती म्हणजे चीनमधले कलाकार, लेखक, विचारवंत किंवा अमेरिका आणि ब्रिटनमधून उच्चशिक्षण घेणारे मात्र मुळचे चिनी नागरिक. याच १०० लोकांना चिनी प्रशासनाने काही कारण न देता तडकाफडकी तुरुंगात डांबले. या व्यक्ती त्यांच्या जिनपिंगविरोधी विचारांचा प्रभाव इतरांवर टाकू शकतात. जनतेला उकसवू शकतात आणि चीनमध्ये विद्यमान जिनपिंग सरकारविरोधात वातावरण तापू शकते, असे चिनी प्रशासनाला वाटते.

चिनी कम्युनिस्ट राजवटीचे हे रूप काही नवे नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर आजूबाजूच्या छोट्या छोट्या देशांना मदतीच्या नावाने मांडलिक करणारा चीन. चीनकडून विकासाच्या नावाने छोटीमोठी तात्पुरती मदत घेणारे देश पार देशोधडीला लागले. श्रीलंका आणि पाकिस्तान ही दोन त्याची उत्तम उदाहरणं. दुसरीकडे तैवान, हाँगकाँग, तिबेट यांच्यावरचीनने जबरदस्तीने कब्जाच ठेवला आहे. या सगळ्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कपटी, लोभी आणि क्रूर, विधिनिषेध नसलेला देश म्हणून चीनने ख्याती प्राप्त केली आहे. या सगळ्याला चिनी राजवट जबाबदार आहे, म्हणूनही चीनची जनता धुमसत आहे. त्यांच्या अस्वस्थतेला कुठूनही वारा आणि थारा मिळू नये, म्हणून चिनी सरकारने अक्षरशःदडपशाहीचा उच्चांक गाठला आहे. पण, चिनी प्रशासन जनआक्रोश किती काळ कम्युनिस्टी कुलपात ठेवणार?


Powered By Sangraha 9.0