उद्धव ठाकरे गट निवडणुकीपासूनही वंचित

22 Feb 2023 14:31:31
Uddhav Thackeray

मुंबई : “शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हदेखील एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला नवीन पक्ष स्थापन करावा लागणार आहे. त्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी जाईल. अशा परिस्थितीत उद्धव यांच्या गटाला एक राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीपासून वंचित राहवे लागू शकते,” असे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वर्तविले आहे.

“निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह बहाल केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या गटाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्याची परिस्थिती बघता एप्रिल अखेरीस विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. त्या दरम्यान या परिस्थितीतून कायदेशीर तोडगा निघाला नाहीतर उद्धव यांच्या गटाला राजकीय पक्षाच्या मान्यतेशिवायच निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे.”

माध्यम प्रतिनिधींशी अकोला येथे संवाद साधताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय मान्यच करावा लागेल, सद्य:स्थितीत वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे गटासोबतच्या युतीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही,” असेही त्यांनी सांगितले.

आंबेडकर पुढे म्हणाले, “आमची युती ही वैयक्तिक असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली. त्यासोबत त्यांनी महाविकास आघाडीत वंचितला घेण्याबाबतचा निर्णय हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला घ्यावयाचा आहे. आमची युती ही ठाकरे यांच्यासोबत आहे. इतर पक्षासोबत नाही. महाविकास आघाडीसाठी उद्धव ठाकरे यांनी काही वेगळा निर्णय घेतला तर आम्ही पुन्हा एकटेच निवडणुकीला सामोरे जाऊ,” असेही ते म्हणाले.


Powered By Sangraha 9.0