कल्याण-तळोजा मेट्रोमुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना

22 Feb 2023 16:30:23
Kalyan-Taloja metro boosts rural development

डोंबिवली : कल्याण-तळोजा मेट्रो मार्गातील १७ उन्नत स्थानकांच्या बांधकामांसाठी ‘एमएमआरडीए’कडून नुकत्याच १ हजार, ५२१ कोटींच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. मेट्रोचे काम येत्या अडीच वर्षांत पूर्णत्वास येण्याचा अंदाज असून या मेट्रोमुळे शहरातील वाहतूककोंडी कमी होणार आहे. तसेच, डोंबिवली ग्रामीण परिसरातून अनेक प्रवासी डोंबिवली रेल्वेस्थानकात येत असतात. परंतु, हे प्रवासी मेट्रोकडे विभागले गेल्याने डोंबिवली रेल्वे स्थानकावरील भार कमी होण्यास मदत होणार असल्याचे मत प्रवासी व नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रोचे विस्तारित रूप म्हणून कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाकडे पाहिले जाते. या मार्गाच्या उभारणीसाठी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून अखेर ‘एमएमआरडीए’ प्रशासनाने स्थानकांच्या प्रत्यक्ष बांधकामांच्या निविदा नुकत्याच जाहीर केल्या आहेत. या निविदांमुळे उन्नत मेट्रो मार्गाच्या उभारणीचे काम लवकरच सुरू होणार आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलमधील नागरिकांना या मेट्रोमुळे दिलासा मिळणार आहे. दरम्यान, कल्याण-तळोजा (मेट्रो १२) अंतर्गत गणेशनगर, पिसावली गाव, गोलवली, डोंबिवली ‘एमआयडीसी’ सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव, निळजे गाव, वडवली (खुर्द), बाळे, वाकलन, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि तळोजा या स्थानकांचा समावेश आहे.

दै. ‘मुंबई तरूण भारत’ने राजकीय नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता सर्वांनीच या मेट्रो प्रकल्पाचे स्वागत केले आहे.

 
वाहतूककोंडीची समस्या काही अंशी सुटेल

रेल्वेस्थानकांपासून जे नागरिक दूर वास्तव्यास आहे, त्यांना रेल्वेस्थानकाकडे न जाता मेट्रोचा पर्याय निवडता येऊ शकतो. चारचाकी आणि दुचाकीचा वापर करणारे प्रवासी नवी मुंबई, तळोजा या ठिकाणी जाताना मेट्रोचा उपयोग करतील. वाहतुकीचा एक चांगला पर्याय नागरिकांना यामुळे उपलब्ध होईल. वाहनांचा वापर कमी झाल्याने वाहतूककोंडीची समस्या काही अंशी सुटेल.- संतोष चव्हाण, डोंबिवली शहर सचिव व विधानसभा क्षेत्र प्रमुख, शिवसेना

ग्रामीण भागाचाही होणार विकास
 
कल्याण-डोंबिवलीतील वाहतूककोंडी पाहूनच खा. डॉ. श्रीकांत शिंदे मेट्रो मार्गाचा पर्याय अमलात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यापैकीच वाहतूककोंडी हादेखील गंभीर प्रश्न होता. कल्याण ग्रामीण भागाचा जसा विकास होणे अपेक्षित होते, तसा विकास झाला नाही. मात्र, आता मेट्रो ग्रामीण भागात आल्याने या ग्रामीण परिसराचादेखील विकास होईल. - बंडू पाटील, परिवहन सदस्य

रेल्वेकडे प्रवाशांचा ओढा वाढतोय

कल्याण-मेट्रोमुळे कल्याण-डोंबिवलीकरांना मोठा फायदा होणार असून प्रवास सुसह्य होणार आहे. मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकावर सर्वात जास्त भार आहे. दररोज जवळपास साडेतीन लाखांहून जास्त जण डोंबिवलीहून मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. दिवसेंदिवस रेल्वेकडे प्रवाशांचा ओढा वाढत आहे. मेट्रोसह शहरात मोठी विकासकामे येत्या काळात होत असून त्याचाही नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. - दिपेश म्हात्रे, माजी स्थायी समिती सभापती, कडोंमपा
 
 
डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण भागाला सर्वाधिक फायदा

कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग हा कल्याण ग्रामीणमधील २७ गावांतून जात आहे. त्यामुळे डोंबिवली पूर्व आणि डोंबिवली पश्चिमेतील नागरिकांना मेट्रोसाठी डोंबिवली ‘एमआयडीसी’मध्ये यावे लागणार आहे. या मेट्रोचा डोंबिवली शहरातील नागरिकांपेक्षा ग्रामीण आणि कल्याण परिसरातील नागरिकांना जास्त फायदा होणार आहे. - राजू नलावडे, सामाजिक कार्यकर्ते


Powered By Sangraha 9.0