मुंबई आपके बाप की नहीं है...याद रखना : नितेश राणे

21 Feb 2023 12:44:09
 
Nitesh and Aditya
  
मुंबई : पवईतील वादग्रस्त आणि अनधिकृत सायकल ट्रॅकवरून भाजप आमदार नितेश राणे यांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 'काहींना अजूनही मुंबई ही आपल्या बापाचीच आहे असं वाटतं. आपल्याला हवं तिथं सायकल ट्रॅक आणि इतर कामे करायची, स्वतः राज्याचे पर्यावरण मंत्री असताना मुंबईच्या पर्यावरणाचे नुकसान होईल असे उद्योग करायचे हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. पवई सायकल ट्रॅक पदकामासाठी काढण्यात आलेल्या कंत्राटाचे ६६ लाख रुपये आदित्य ठाकरेंनी स्वतः मुंबईकरांना परत करावेत. मुंबई आपके बाप की नहीं है..याद रखना,' अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.
 
पवई सायकल ट्रॅकच्या पाडकामासाठी काढण्यात आलेल्या कंत्राटावर बोलताना नितेश राणे यांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. राणे म्हणाले की, ''मुंबईच्या विकासाला आमचा विरोध असण्याचे काहीही कारण नाही, विकास हा झालाच पाहिजे. परंतु, मुंबईच्या पर्यावरणाशी खेळ करून होणारा विकास आम्हाला मान्य नाही. विकास करताना मुंबईच्या पर्यावरणाला धोका पोहचत असेल तर तुम्हाला पर्यावरणावर आणि पर्यावरण संवर्धनावर आम्हाला शिकवण्याचा काहीही अधिकार नाही.''

''पवईच्या सायकल ट्रॅकचे पाडकाम करण्यासाठी लागणारा ६६ लाखांचा खर्च मुंबईकरांच्या कष्टाच्या पैशातून होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्य खिशातून जाणारा ६६ लाखांचा खर्च आदित्य ठाकरेंनी स्वतः करायला पाहिजे आणि त्यातून मुंबईकरांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करावी,' अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे.

मुंबईवरचं प्रेम दाखवण्याची हीच ती वेळ !

''मुंबई आणि महाराष्ट्रावर आमचं प्रेम आहे असे डायलॉग मारणाऱ्यांनी आता ते प्रेम खरे आहे की खोटे हे दाखवून द्यावे. जर तुमचं प्रेम खरं असेल तर तुम्ही ही भरपाई कराल अन्यथा आमचं मुंबई आणि महाराष्ट्रावर प्रेम आहे हे केवळ डायलॉग असून वास्तवात तुम्ही बेशरमपणे बडबड करता हे सिद्ध होईल. त्यामुळे मुंबईवरचं तुमचं प्रेम आहे तर ते दाखवण्याची हीच ती वेळ आहे,' असा टोलाही नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.

 
 
 
Powered By Sangraha 9.0