शिंदे गटाचे पुढचे टार्गेट शिवसेना भवन आणि शाखा ?

20 Feb 2023 19:27:00
Shinde group's next target is Shiv Sena Bhavan

मुंबई
: पक्षाचे चिन्ह आणि नाव मिळाल्यानंतर आता शिंदेंच्या नेतृत्वातील मूळ शिवसेना अधिकच आक्रमक झाली आहे. सोमवारी शिवसेना पक्षाला विधान मंडळात देण्यात आलेले विधिमंडळ पक्ष कार्यालय सेना नेत्यांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर आता शिवसेनेची आक्रमकता वाढण्याची शक्यता असून शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे पुढील लक्ष शिवसेना भवन आणि राज्यातील शिवसेनेच्या शाखांवर असल्याचेही आता बोलले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील सेना दादर मधील शिवसेना भवन आणि सेनेच्या शाखांवरून दोन गटांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर शिंदेंच्या नेतृत्वातील मूळ शिवसेना अधिकच आक्रमक झालेली दिसत आहे. आयोगाच्या निर्णयानंतर ठाण्यासह इतर काही महत्त्वाच्या शहरांमधील सेनेच्या शाखांवर ताबा मिळवण्यास शिंदेंच्या नेतृत्वातील नेते आणि कार्यकर्त्यांनी सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावरून आता शिंदे गट आता शिवसेना भवनवरही दावा ठोकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पण कायद्याच्या अभ्यासकांनी आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषकांनी याबाबत वेगळीच माहिती दिली आहे.
 
कायद्यानुसार, शिवसेना भवन ही इमारत अधिकृत शिवसेना पक्षाच्या नावावर नसून शिवाई ट्रस्टची आहे. त्यामुळे शिवसेना भवनचा ताबा शिंदेंच्या नेतृत्वातील मूळ शिवसेनेकडे जाण्याची शक्यता तशी धूसरच दिसते आहे. परंतु, मुंबईसह राज्यभरात ज्या शिवसेनेच्या शाखा आहेत त्याच्या मालकीवरून मात्र या दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष होण्याची दाट शक्यता आहे. त्यासोबतच प्रबोधन प्रकाशन यांच्याकडून प्रकाशित केले जाणारे शिवसेनेचे मुखपत्र 'दैनिक सामना' आणि 'मार्मिक' याबाबतही अशीच काहीशी परिस्थिती आहे. या दोन मालमत्ता आणि प्रकाशनांवरही आताच्या मूळ शिवसेनेला दावा करता येणे तसे काहीसे अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे 'शिवसेना भवन', 'सामना' आणि 'मार्मिक' वर मूळ शिवसेनेला दावा सांगता येणार नाही, असे कायद्याच्या अभ्यासकांनी म्हटले आहे.

आमची दावेदारी विचारांवर वास्तूंवर नाही - शिवसेनेचे स्पष्टीकरण


शिवसेना भवन आणि इतर मालमत्तांवरील ताब्याबाबत शिवसेना नेत्यांना विचारले असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ''आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत. आम्हाला केवळ आणि केवळ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी आणि लोकहितकारी विचारांची जपणूक करायची असून त्यांनी दिलेला विचार अंगीकृत करणे आणि तो वैचारिक वारसा महाराष्ट्रासह देशभरात पोहचविणे हेच आमचे एकमेव उद्दिष्ट आहे. आमची दावेदारी बाळासाहेबांच्या विचारांवर असून शिवसेना भवन किंवा इतर कुठल्याही वास्तूवर नाही,' असा खुलासा शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने केला आहे.

Powered By Sangraha 9.0