मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक मुंबईतील शिवसेना भवन येथे सोमवारी घेतली. यावेळी त्यांनी जिल्हाप्रमुखांना भावनिक आवाहन केले. "२०२४ साली देशात हुकुमशाही येणार असल्याचे यावेळी ठाकरे म्हणाले. तसेच आपल्याकडे मशाल चिन्ह आहेच, त्याशिवाय माझ्या मनात आणखी दहा चिन्ह आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चिंता न करता आता संघर्ष करण्यास तयार रहावे. भाजपाचे तळवे चाटण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही." असं ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना धडा शिकवण्यासाठी आता शिंदे गटाकडून राज्यभरात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाकडून सर्व ५६ आमदारांना व्हिप बजावला जाणार आहे. हा व्हिप आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना देखील लागू होईल, असे प्रतोद भरत गोगावले म्हणाले.
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाने आता विधीमंडळातल्या कार्यालयाचा ताबा घेतला. विधानभवनातल्या शिवसेना कार्यालयात शिंदे गटाच्या आमदारांनी प्रवेश केला. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी विधीमंडळातल्या शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार सदा सरवणकर उपस्थित होते.