कमळवाल्यांनो, बोलवा रे...

02 Feb 2023 21:19:59
Mahavikas Aghadi


महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होणार... हे सरकार कोसळणार... परत आम्हीच सत्तेमध्ये येणार... आम्हीच खरे शिवसैनिक! केंद्राचा महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव.. मुंबई तोडण्याचा डाव. काय म्हणता कोण म्हणतं? कोण म्हणजे काय मी मी म्हणतो. मीच तो मागे बारामती आणि वांद्रेच्या साहेबांना भेटवून महाविकास आघाडी तयारी केलेली तो मी! अहाहा काय ते सुवर्ण दिवस होते. ‘हम करे सो कायदा नाय नाय हम बोले सो कारवाईच व्हावी’ असे ते दिवस. त्यावेळी आमचे वांद्य्राचे साहेब म्हणाले होते की, पक्ष दिल्लीवर स्वारी करेल. अखिल भारतीय स्तरावर राज्य करेल आणि महाराष्ट्रात पक्षातील दुसर्‍या कुणाला तरी राजा बनवतील. राजा म्हणजे मुख्यमंत्री हो!! काय हुरूप आला होता सांगू. दिल्लीचे राहुल गांधी असू देत की, आमचे सर्वेसर्वाशरदचंद्र पवार साहेब असू देत, सगळ्यांच्या सोबत मी असायचो. आठवते ना, ‘आप आये बहार आये’ वाक्य. राहुल साहेबांना पाहून मी म्हटले होते हे वाक्य. थोर थोर पवार साहेबांची खुर्ची पण मीच उचलली. ते फक्त एकाच आशेसाठी- ‘होणार सून मी त्या घरची’ की सारखं ‘होणार मुख्यमंत्री मी महाराष्ट्राचा’ या आशेवर!‘मैं नही तो कौन बे’, आता ते काय गाणं फेमस झालं ना... तसचं होतं माझं. पण, ‘में तो थाही नही.’ ’शेवटी, ‘मेरा सुंदर सपना तुट गया.’ पत्राचाळ आणि प्रकरणच नशिबात आले. तर मुद्दा असा की, त्या केंद्र सरकारला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. कशी काय विचारता? मला काय माहिती? मला असं बोलावच लागतं. देशात कुठेही कोणतीही घटना घडली की, लगेच महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होणार, हे सरकार कोसळणार. केंद्राचा महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव.. काय म्हणता याने मुंबईतला मराठी माणूस किंवा महाराष्ट्र आता अजिबात भुलणार नाही. हे बघा असे आम्हाला नाउमेद कराल तर खबरदार! हा पाहा उभा महाराष्ट्र पेटून उठेल!! आम्ही म्हणजे महाराष्ट्र!!! काहीही झाले तरी मी त्यांच्यापुढे झुकणार नाही. त्यांनी कितीही बोलावले तरी मी त्यांच्याकडे जाणार नाही. काय म्हणता मला बोलवते कोण? हो तेही खरेच आहे म्हणा. तिथे कुणी बोलवत नाही आणि इथे वंचितसह अंधार सोबतीला आला. काय करू? अरे कमळवाल्यांनो, मला बोलवा रे. कुणीतरी बोलवा. खोटं का होईना एकदा बोलवा रे...
‘ऑनर किलिंग’ थांबवा!

शुभांगी जोगदंड ‘बीएएमएस’ची विद्यार्थिनी.. गावातल्या स्वजातीतल्याच एका मुलासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. पण, घरातल्यांना ते मान्य नव्हते. त्यांनी तिचे लग्न दुसर्‍या मुलाशी ठरवले. पण, त्यांना शुभांगीचे प्रेमप्रकरण कळले आणि लग्न तुटले. अत्याधिक संतापाने तिच्या घरातल्यांनीं शुभांगीचा गळा दाबून खून केला. शेतात तिचा मृतदेह जाळला आणि मृतदेहाची राख वाहत्या पाण्यात टाकली.शुभांगीचे वडील, मामा आणि भाऊ. पाच जणांनी शुभांगीचा निर्घृण खून केला. वरील घटना आपल्या महाराष्ट्रातल्या नांदेडच्या लिंबगावमधली. त्यापूर्वीही महाराष्ट्रात ‘ऑनर किलिंग’च्या नावाने कुठे गरोदर बहिणीचे सख्ख्या भावाने मुंडके छाटले होते, तर कुठे अख्ख्या कुटुंबाने मिळून मुलीचा आणि जावयाचाही खून केला होता.संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार, जगभरात ‘ऑनर किलिंग’ होते. दरवर्षी जगभरात पाच हजार मुली ‘ऑनर किलिंग’चा बळी ठरतात. भारतात ‘ऑनर किलिंग’चा सरासरी आकडा २५ आहे. ‘ऑनर किलिंग’च्या गुन्ह्यासाठी भारतात २०१० साली पहिल्यांदा पाच जणांना शिक्षा सुनवण्यात आली. एप्रिल २००७ साली चंदीगढच्या मनोज आणि बबली या दोघांनी विवाह केला. त्यांचे गोत्र एक होते. त्यामुळे खाप पंचायतीने त्या दोघांना मरेपर्यंत गळफास दंड दिला. पंचायतीसमोर त्यांना जून २००७ साली फासावर लटकवले गेले. शिक्षा सुनावणार्‍या आणि शिक्षेची कारवाई करणार्‍या पाच जणांवर पहिल्यांदा ‘ऑनर किलिंग’चा गुन्हा नोंदवला गेला आणि शिक्षा झाली. असो. शुभांगीच्या खुनाबाबत प्रसारमाध्यमांत ज्या बातम्या दिल्या गेल्या, त्याखालील कमेंट पाहायला हव्यात. बहुसंख्य लोकांनी शुभांगीच्या पालकांनी केले ते योग्यच केले, शुभांगीसारख्या मुलींसोबत असेच व्हायला हवे आणि तिच्या पालकांना पोलिसांनी सन्मानाने बाहेर सोडावे, असे लिहिले आहे. शुभांगीने आई-वडिलांच्या मर्जीविरोधात जीवनसाथी निवडला, हे बहुसंख्य लोकांच्या मते चूक होते. बहुसंख्य लोकांना असे का वाटते? समाजमनाच्या या अशा मानसिकतेचे आकलन करणे गरजेचे आहे. मर्जीविरोधात विवाह याबाबत पालक आणि पाल्य यांचे म्हणणे काय असते, याबाबत मागोवा घेत त्याबद्दल तीव्र प्रबोधन करण्याची आणि ‘ऑनर किलिंग’बाबत तत्काळ कडक कारवाई करण्याची आज नितांत गरज आहे.





Powered By Sangraha 9.0