समाजाला दिशा देणारे श्रीकांत

19 Feb 2023 18:43:08
Shrikant Pavgi

डोंबिवली शहरातील ४७ संस्थांनी एकत्र येऊन संस्कृतीप्रिय डोंबिवली शहराच्या गेल्या सात दशकांच्या वाटचालीमध्ये सक्रिय साक्षीदार असलेले डोंबिवलीकर श्रीकांत पावगी यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. अभिवादन सोहळ्याच्या निमित्ताने पावगी यांच्या कार्यावर टाकलेला हा प्रकाश.

समाजाला दिशा देणारी काही मंडळी असतात. काही दशकांपूर्वी अशा मंडळींचा समूह समाजात ठिकठिकाणी कार्यरत असायचा. अगदी गावपातळीपासूनच अशा समाजधुरिणांच्या सभोवताली निरलसपणे काम करणार्‍या कार्यकर्त्यांची फळी असायची. दिशादर्शक मंडळींचे कार्य पुढे नेण्यासाठी असे कार्यकर्ते आवश्यक असायचे. निरपेक्षपणे सामाजिक क्षेत्रात वावरणार्‍या सुसंस्कृत कार्यकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. डोंबिवली शहरातील अनेक प्रथितयश संस्थांच्या स्थापनेसाठी आणि विकासासाठी आवश्यक असणार्‍या निरपेक्ष कार्यकर्त्यांसाठी श्रीकांत हे एक आदर्श उदाहरण आहेत. दिशादर्शक ठरणारी मंडळी काळानुरूप अस्तंगत होत असताना श्रीकांत यांचा आजही सुरू असलेला व्यस्त दिनक्रम सामाजिक क्षेत्रात येत असलेल्या नवीन पिढीसाठी मार्गदर्शक ठरत आहे.

श्रीकांत यांचा जन्म दौंड येथे झाला. त्यांची बालपणीची मोजकी वर्ष इगतपुरी येथे गेली. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी कुटुंब डोंबिवलीत स्थिरस्थावर करण्याचे ठरविले. आणि पावगी कुटुंब १९५७ ला डोंबिवलीत आले. त्यांचे शालेय शिक्षण डोंबिवलीतील स. वा. जोशी विद्यालयात झाले. दातार वाड्यातील घर आणि दातार वाड्याच्या समोर असलेले डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिर यांच्या सान्निध्यात बालपणी सुसंस्कृतपणाचे आणि सामाजिक क्षेत्रात वावरण्याचे आणि नैतिकतेचे संस्कार कळत-नकळत, गुणिजनांच्या सहवासात त्यांच्यावर होत गेले. दातार वाडा आणि गणेश मंदिर हे दोन्ही डोंबिवलीतील महत्त्वाच्या घडामोडींचे केंद्र असायचे. वाड्याच्या सान्निध्यात व्यक्तीमत्त्व घडले. गणेश मंदिराच्या सान्निध्यात श्रीकांत पावगी यांच्यातील कार्यकर्ता घडत गेला.

नाटय, साहित्य, राजकारण, पत्रकारिता, बॅकींग, संगीत आणि शिक्षण अशा विविध सांस्कृतिक क्षेत्रात गेली पाच दशकांहून अधिक काळ मुशाफिरी श्रीकांत यांनी केली आहे. त्यांनी वयाची नुकतीच पंचाहत्तरी पूर्ण केली आहे. पण सतत सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहण्याची ओढ, अफाट स्मरणशक्ती, गेल्या काही दशकांत घडलेल्या कोणत्याही घटनेबद्दल तारीख वार यांच्यासह तपशीलवार माहिती तोंडपाठ हे श्रीकांत यांचे खास वैशिष्ट्य. डोंबिवली शहराच्या गाव ते शहर या प्रवासाचे महत्त्वाचे साक्षीदार म्हणून ही श्रीकांत यांचे नाव घ्यावे लागेल. महाविद्यालयीन जीवनात युवक संघाच्या माध्यमातून साहित्य, नाट्य क्षेत्रातील मुशाफिरी सुरू झाली तो क्षेत्र विस्तार आज शैक्षणिक क्षेत्रातील कार्यापर्यंत झालेला आहे.

श्रीकांत हे ‘बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरी करत होते. त्याठिकाणी ही कारर्किदीत यशस्वी होता होता विविध पध्दतीने त्यांनी शाबासकीची थाप मिळविली. श्रीकांत हे शिक्षण सुरू असतानाच सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत होते. तसेच नोकरी करत असताना उच्च शिक्षण घेत सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. कुटुंबवत्सल, धार्मिक आणि श्रद्धाळू वृत्तीचे श्रीकांत हे घरापेक्षा जास्त डोंबिवलीत रमतात, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ‘बँक ऑफ इंडिया’मधील नोकरीच्या सुरुवातीच्या काळात लेखापरीक्षण विभागात काम करताना भारतात आणि त्यानंतर काही दिवस इंग्लंडमध्ये झालेली भ्रमंती, बँकेची आपल्या कर्मभूमीत शाखा स्थापन करण्यात महत्त्वाचा हातभार आणि त्याच शाखेत काही वर्ष व्यवस्थापक पदावर केलेले काम, या सर्व काळात जोडलेली, अनुभवलेली माणसं आणि त्यांच्या साथीला व्यावसायिकता आणि सामाजिक कार्य यांची जोडलेली नि:स्वार्थी मोट विलक्षण आहे, असे श्रीकांत सांगतात.

श्रीकांत यांचा एकसष्टीचा समारंभ जाहीर स्वरूपात साजरा झाला. त्या समारंभात विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. श्रीकांत यांना त्यांच्या कामात खरी साथ मिळाली ती त्यांच्या पत्नी शुभदा पावगी यांची. त्यांच्या पत्नीने सर्व कुटुंब व्यवस्थित सांभाळत स्वत:चा सांगीतिक उत्कर्ष साधला व स्वत:ला शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील अभ्यासू जाणकार म्हणून सिद्ध केले आहे.श्रीकांत हे गेल्या पाच वर्षांपासून टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळात कार्याध्यक्ष, शिवानंद स्वामी संस्थेचे सहसचिव म्हणून काम पाहिलेले आहे. युवक संघ ग्रंथालयात कार्यरत होते. गणेश मंदिर संस्थान गणेशोत्सव मंडळ येथे सदस्य म्हणून कार्यरत होते.

खासदार रामभाऊ म्हाळगी व खा. प्रा. राम कापसे यांचे मौलिक विचार प्रेम डोंबिवलीकरांना लाभले आहे म्हणून त्यांचे ऋण फेडण्यासाठी ठाणे-कल्याण प्रमाणे डोंबिवलीकरांनी त्यांच्याप्रीत्यर्थ एक व्याख्यानमाला आयोजित करावी. डोंबिवलीत शास्त्रीय संगीताचेही कार्यक्रम सादर करावेत आणि वयाच्या ऐंशीव्या वर्षी एक विनोदी किंवा गंभीर भूमिका देऊन रंगभूमीची सेवा करण्याची संधी मिळावी, असा त्यांचा मानस आहे.




Powered By Sangraha 9.0