: शिवसेना नाव आणि चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर आता उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. पक्षाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट जे अद्यापही उद्धव ठाकरे चमूकडेच होते. मात्र, ठाकरे गटाने निकाल आल्यानंतर त्याचेही नामकरण 'शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे', असे केल्याने ट्विटरच्या नियमावलीनुसार ब्लू टीक हटवण्यात आले आहे. उद्धव ठाकरे गटाला सोशल मीडियावर हा मोठा दणका मानला जात आहे. 'शिवसेना' ट्विटर अकाऊंटचे एकूण ८ लाख ४८ फॉलोअर्स आहेत. तर 'शिवसेना कम्युनिकेशन्स' या ट्विटर खात्याचे एकूण २ लाख १३ हजार इतके फॉलोअर्स आहेत. मात्र, ठाकरे गटाच्या सोशल मीडिया टीमने रात्री उशीरा दोन्ही गटाचे ट्विटर आयडी बदलल्याने हा फटका बसला आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अत्यंत महत्त्वाचा निकाल निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिला. आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळताच शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार जल्लोष तर केलाच परंतु शिंदे गटाचा सोशल मीडिया स्ट्राईक देखील यानिमित्ताने पाहायला मिळत आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी त्यांचा प्रोफाईल फोटो बदलून 'धनुष्यबाण' ठेवले आहे. एवढेच नाही तर अनेक कार्यकर्त्यांनी देखील आपले प्रोफाइल फोटो बदलून धनुष्यबाण ठेवले आहे.
निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्यानंतर स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरवरील आपला प्रोफाईल फोटो बदलत धनुष्यबाण ठेवले. त्यासोबतच उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीकांत शिंदे या नेत्यांनी देखील ट्विटरवरील आपला प्रोफाईल फोटो धनुष्यबाण ठेवला आहे.
दरम्यान शिंदे गटात असणाऱ्या जवळपास सर्वच मंत्र्यांनी त्यांचे ट्वीटर आणि फेसबुकवरील प्रोफाईल फोटो धनुष्यबाण केले आहे. त्यासोबतच शिंदे गटात असणारे समाधान सरवणकर, शीतल म्हात्रे, आत्माराम चाचे या माजी नगरसेवकांनी देखील आपला प्रोफाइल फोटो बदलला आहे. यासोबतच अनेक कार्यकर्त्यांनी देखील शिंदे गटाला पाठिंबा देत आपला प्रोफाइल फोटो बदल्याने शिंदे गटाचे हे सोशल मीडिया स्ट्राईक सुद्धा आता ठाकरे गटाला महागात पडेल का अशी शंका उपस्थित होत आहे.
प्रोफाईल फोटोवर धनुष्यबाण ठेवलेले नेते
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उद्योगमंत्री उदय सामंत
उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई
खासदार श्रीकांत शिंदे
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर
कृषीमंत्री अब्दुल सत्तार
आरोग्य मंत्री तानाजी सावंत
बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे