सोरोस म्हणजे वृद्ध, हटवादी आणि धोकादायक व्यक्ती : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर

18 Feb 2023 19:21:47
Foreign Minister S. Jaishankar


नवी दिल्ली : जॉर्ज सोरोससारख्या श्रीमंत वृद्ध, हटवादी आणि धोकादायक व्यक्तीस वाटते की जग कसे चालेल, हे तेच ठरवतील. मात्र, आता परिस्थिती बदलली असून सत्यास सामोरे जाण्याची वेळ आली आहे; अशा शब्दात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अराजकतावादी जॉर्ज सोरोसवर पलटवार केला आहे.

‘रायसिया अॅट सिडनी डायलॉग’ या कार्यक्रमात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अब्जाधीश अराजकतावादी जॉर्ज सोरोस आणि त्याच्या इकोसिस्टीमवर जोरदार प्रहार केला आहे. ते म्हणाले, सोरोस हे न्युयॉर्कस्थित वृद्ध, श्रीमंत, हटवादी आणि धोकादायक व्यक्ती आहेत. त्यांना अद्यापही असेच वाटते की संपूर्ण जग कसे चालते, हे तेच ठरवतात. असे लोक त्यांना हवे ते घडविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. त्यांना हवा तो व्यक्ती निवडून आल्यास त्यांच्यासाठी निवडणूक योग्य असते. मात्र, निवडणुकीत वेगळा निकाल लागला तर ते लोकशाहीस दोष देतात. विशेष म्हणजे हे सर्व प्रकार ते मुक्त समाजाची वकीली करण्याच्या नावाखाली करत असल्याचे जयशंकर यांनी म्हटले.

सोरोस हे मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवत असल्याचे परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भारत हा लोकशाहीवादी देश असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाहीवादी नसल्याचे त्यांचे अजब मत आहे. यापूर्वीदेखील त्यांनी भारतावर देशातील लाखो मुस्लिमांचे नागरिकत्व काढून घेतल्याचा हास्यास्पद आरोप केला होता. जागतिकीकरण आणि मुक्त समाजाच्या नावाखाली अशा प्रकारो भय निर्माण करणे हा मनोविकृतीचा प्रकार असल्याचाही टोला जयशंकर यांनी लगाविला आहे.


 
Powered By Sangraha 9.0