वैदिक क्रांतीचे अग्रदूत : महर्षी दयानंद

    16-Feb-2023
Total Views |
 
अज्ञान व अविद्येमुळे अंधारात कितपत पडलेल्या मानवसमूहाला सत्यज्ञानाच्या प्रकाशात आणणारे थोर वेदज्ञ समाजसुधारक महर्षी दयानंद सरस्वती यांच्या 200व्या जयंतीचे हे वर्ष. नुकतेच दि.12 फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या द्विजन्मशताब्दी वर्षाचे उद्घाटन झाले. त्यानिमित्त स्वामी दयानंद यांच्या प्रेरक विचार व कार्यांचा घेतलेला हा आढावा.

dayanad saaswati 
 
रतात एकोणिसाव्या शतकाची प्रबोधन पहाट ही कितीतरी समाजसुधारकांच्या उदयाने तेजोमय ठरली. याच सत्पुरुषांच्या मौक्तिकमालेला सर्वाधिक उज्ज्वल बनविणारे वेदज्ञ महापुरुष म्हणजे महर्षी दयानंद सरस्वती होय. धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात पूर्वी घडलेल्या चुकांवर प्रतिक्रियावादी न बनता व नवा मतप्रवाह निर्माण न करता, त्यांनी आपल्या प्रखर पांडित्याने वेदांचे मूलभूत शुद्ध स्वरूप जगासमोर मांडले आणि त्याच वेदज्ञानाच्या माध्यमाने जगाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखविला. या अनुषंगाने त्यांनी स्थापन केलेल्या ’आर्य समाज’ या संस्थेचा उद्देशदेखील सर्वहितकारी व उदात्त दिसून येतो. स्वामीजींचा क्रांतिकारी जीवनपट उलगडताना आपणास त्यांच्या अपूर्व त्यागाचे कठोर साधनेचे व महानतम कार्यांचे सातत्याने दर्शन घडते. विज्ञानवादी व बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोन समोर ठेवून स्वामीजींनी प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान, धार्मिक कर्मकांड व अध्यात्माची योग्य ती चिकित्सा केली व त्यांना विशुद्ध स्वरूपात जगासमोर मांडले. कोणत्याही बाबतीत केवळ एकांगी न बनता, सत्याचे मंडन व असत्याचे खंडन करीत त्यांनी जागतिक पातळीवर वेदांचे तत्त्वज्ञान विशद केले.
 
मानवी जीवनाच्या दुःखाचे मूळ अविद्या व अज्ञानात आहे. मानवातील काम, क्रोध, लोभ, ईर्ष्या इत्यादी षड्रिपू आणि धार्मिक थोतांड व अंधश्रद्धा यांच्यात अज्ञानाची बीज दडलेली आहेत. हे अज्ञान दूर करण्यासाठी सत्यज्ञान हवे आणि या मूलभूत सत्यज्ञानाचा मूलभूत स्रोत वेदांच्या ज्ञानतत्त्वातून प्रवाहित होतो. पण, याच दिव्य वेदज्ञानाची महाभारतानंतरच्या काळात अयोग्य पद्धतीने मांडणी झाल्याने अनेकांचा वेदांवरील विश्वास उडाला. तत्कालीन प्रस्थापित पंडितांनी वेदमंत्रांचे चुकीचे अर्थ लावल्याने अंदाधुंद व्यवस्था निर्माण झाली. बहुदेवतावाद, अवतारवाद, मूर्तिपूजा, धार्मिक अवडंबर, फलज्योतिष, यज्ञात पशुबळी, नरबळी, जन्मानुसार वर्णव्यवस्था, आश्रम व्यवस्थेची विल्हेवाट, स्त्रियांची अवहेलना, दलितांवर अत्याचार, बुवाबाजी यांसारखे दोष निर्माण झाले. पण, स्वामीजींनी अष्टाध्यायी, व्याकरण महाभाष्य, निरुक्त, छंद आदी वेदांगांच्या अभ्यासाने वेदमंत्रांचे आधिदैविक, आधिभौतिक व आध्यात्मिक पद्धतीने अर्थ लावून त्या त्या मंत्रांवर यथार्थ भाष्य केले.
 
रुढ अर्थांना सोडून त्यांनी वेदमंत्रांच्या यौगिक व्याख्या केल्या. यापूर्वीच्या सायणाचार्य, महीधर, उव्वट इ. भाष्यकारांनी वेदमंत्रांचे शाब्दिक अर्थ लावल्याने त्यात विसंगती आली. त्यामुळे ते अर्थ चुकीचे ठरले व जिज्ञासू अभ्यासकांत गैरसमज पसरू लागले. त्यामुळेच तर मॅक्समूलरसारख्या पाश्चात्त्य अभ्यासकांने वेदमंत्रांची ’मेंढपाळाची गाणी’ म्हणून अवहेलना केली. पण, जेव्हा त्यांनी महर्षींचे वेदभाष्य अभ्यासले, त्यावेळेस त्यांना वेदांविषयी यथार्थ समजले. ते म्हणतात, “स्वामीजींच्या दृष्टिकोनातून वेदात प्रतिपादित केलेली प्रत्येक वस्तू ही केवळ पूर्ण सत्यच नव्हे, तर आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर संशोधक स्वरूपाची आहे.” त्याचवेळी योगी अरविंद घोषदेखील प्रभावित होऊन म्हणतात, “स्वामी दयानंदांनी आपल्या प्रखर अभ्यासातून वेदांमध्ये धार्मिकतेबरोबरच वैज्ञानिकतादेखील शोधून काढली आहे.”
 
वेदातील अनेक मंत्रात देवतांच्या रूपात वर्णिलेली इंद्र, अग्नी, विष्णू, शिव, मरुत् इत्यादी नावे एकाच ईश्वरासाठी अथवा आत्म्यासाठी असून त्या त्या विषयांच्या प्रसंगानुरूप त्यांचे अर्थ घेण्यात यावेत. परमेश्वर हा एकच असून तो कणाकणात व्यापलेला आहे. ’ईशावास्यमिदं सर्वम्!’ त्याला शोधण्यासाठी इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही. भगवंताची उपासना ही यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या आठ अष्टांगांच्या अनुष्ठानाने होते, असे स्वामीजींचे दृढ मत होते. सर्वांसाठी एकच उपासनापद्धती असून ती शुद्ध आचरण व एकाग्रतापूर्ण ध्यानाने पूर्णत्वास येते. वेदामध्ये मूर्तिपूजेला मुळीच स्थान नाही. यासाठी ते यजुर्वेदाच्या ‘न तस्य प्रतिमाऽस्ति, यस्य नाम महद्यश:।’ या मंत्राचे प्रमाण देतात.
 
वैदिक वर्णव्यवस्था ही जन्मावर आधारित नसून ती मानवाच्या गुण, कर्म व स्वभाववैशिष्ट्यांवर आधारलेली आहे. यजुर्वेदाच्या ‘ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहु: राजन्य कृत:...!’ या मंत्राची त्यांनी तर्कसंगत व्याख्या केली आहे. ते म्हणतात की, “जो ब्रह्मतत्त्व जाणतो, तोच खरा ’ब्राह्मण.’ तसेच जो सात्विक, शुद्ध व पवित्र आचरण ठेवत सतत विद्यादान व प्रबोधनाच्या कार्यात व्यग्र असतो, त्यालाच ’ब्राह्मण’ समजावे. जो समाज व राष्ट्राचे रक्षण करतो, दीनदु:खितांची दुःखे दूर करण्यासाठी शौर्य गाजवितो व प्रसंगी प्राणही देतो, तो क्षत्रिय होय. जो देशाची अर्थव्यवस्था चालवण्याकरिता व्यापार, उद्योग, शेती, पशुपालन इत्यादी कार्य करतो, तो वैश्य आणि जो मनोभावे कर्तव्यभावनेतून सेवेचे व्रत आचरतो, तो शूद्र होय. हे चार वर्ण म्हणजे राष्ट्ररूप पुरुषाचे क्रमशः मुख, बाहू, मांडी व पाय होत. हे चारही घटक समाज व राष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. यांच्या कोणीही भेदाभेद करू नये.
 
स्वामीजी समग्र विश्वात एकाच मानवतावादी वैदिक धर्माची स्थापना करू इच्छितात. वेदात व इतर वैदिक शास्त्रात कुठेही हिंदू, मुस्लीम, जैन, बौद्ध, शीख इत्यादी मनुष्यकृत मत-संप्रदायांचा उल्लेखच नाही. हे पंथ (धर्म) व जातिभेद, तर मानवाच्या क्षुद्र बुद्धीतून प्रकट झाले आहेत. वेदांनी तर आम्हास मनुर्भव जनया दैव्यं जनम्! आपण श्रेष्ठ माणूस व्हावे आणि मानवतेवर आधारित समाज निर्माण करावा, असा आदेश दिला आहे. याच आदर्श मानव समूहाला वेदज्ञानाच्या छायेत आणण्यासाठी स्वामीजींनी मुंबई येथे 1875 साली ’आर्य समाज’ या संस्थेची स्थापना केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आर्य समाजाने मोठे योगदान दिले आहे. स्वामीजींच्या अनेक शिष्यांनी वेदप्रचार, जातिप्रथा निर्मूलन, गुरुकुल संचालन, डीएव्ही शिक्षण संस्था, योग प्रसार, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती अभियान या कार्यांसह हिंदी सत्याग्रह, गोहत्या बंदी आंदोलन, हैदराबाद स्वातंत्र्यसंग्राम इत्यादी चळवळीतदेखील सहभाग नोंदवला, तर सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात मोलाची भूमिका बजावली आहे.
 
स्वामीजींचे हे विचार म्हणजे खर्या अर्थाने पुरातन वैदिक असले, तरी ते वैज्ञानिक व तांत्रिकदृष्ट्या शुद्ध स्वरूपाचे असल्याने आधुनिक काळासाठी पुरोगामी ठरतात. त्यांचा अवलंब केल्यास निश्चितच क्रमशः व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र व विश्वाची सर्वांगीण प्रगती होण्यास मदत मिळते. अशा या थोर क्रांतिकारी युगपुरुषास त्यांच्या 200व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
 
प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य