पुणे : महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले शिवनेरी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कार्यक्रमांचे 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान आयोजन केले आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंदाची शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासोबतच महाराष्ट्रातील लोकसंस्कृती व महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे. महत्वाच्या उपक्रमांचे पर्यटन वेळापत्रक बनविले असून त्याच उपक्रमांतर्गत यंदापासून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.
शिवकालीन गाव हे या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असून या वर्षी प्रथमच महाशिव आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याच्या निमित्ताने शिव वंदना, स्थानिक पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिबीर, विविध स्पर्धांचे आयोजन, पर्यटक आणि मान्यवरांसाठी सहलीचे इत्यादींचे आयोजन करण्यात येईल.
शिवनेरी, रायगड व सिंधुदुर्ग हे महत्वाचे किल्ले असून, शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने हिंदवी स्वराज्य नव्यापिढी पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.
तीन दिवस चालणारे कार्यक्रम पुढील प्रमाणे
येत्या शनिवारी, (18 फेब्रुवारी) हिंदवी स्वराज्य महोत्सवाची 2023 सुरुवात होईल. त्यानंतर अशोक हांडे यांचा मराठी बाणा कार्यक्रम होईल, रविवारी, (दि. 19) सकाळी 9 ते 11 शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा, दुपारी शिववंदना व त्यानंतर महाआरती होईल. त्यानंतर जाणता राजा या महानाट्याचा कार्यक्रम तसेच, सोमवारीही (दि.20 ) त्याच कार्यक्रमांनी सांगता होईल.