पिंपरी : चिंचवड मतदारसंघातील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जयंतीनंतर पोटनिवडणूकीसाठी रिंगणात असलेल्या त्यांच्या पत्नी महायुतीच्या उमेद्वार अश्विनी जगताप यांनी गुरूवारी जारी केलेल्या अहो या भावनिक पत्राची समाजमाध्यमांवर चांगलीच चर्चा होती.
अश्विनी जगताप यांनी या पत्रात,
काल तुमची जयंती. खरं तर वाढदिवस आनंदाचा दिवस, गेल्या वर्षीपर्यंत हा दिवस संपूर्ण पिंपरी चिंचवड मध्ये अगदी आनंदाने उत्साहाने साजरा होत होता. पण दैवाने घात केला आणि तुम्ही अचानक निघून गेलात. तुमच्या जाण्याने कुटुंबावरच नव्हे तर संपूर्ण शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला. काल पहिल्यांदा तुमची जयंती साजरी झाली, म्हणूनच हे पत्र लिहावं वाटल्याचे नमूद करून या भागातील तुम्ही कमावलेला प्रत्येक माणूस तुमच्या स्मृतीस्थळी लीन आणि भावूक झाल्याचे बघितले.
जशी वाढदिवसाला शहरभर तुमची चर्चा व्हायची तशीच चर्चा होत होती मात्र यावेळी चर्चांना दुःखाची किनार असल्याचे या पत्रात त्यांनी नमूद केले आहे.
तुम्ही माय माऊली मानून ज्यांची सेवा केली त्या माता भगिनी हळव्या होतांना बघितल्या, प्रत्येक कार्यकर्ता रडतांना दिसला. विविध ठिकाणी सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. लोकांचे हे प्रेम बघून आज खरचं वाटलं की तुमच्यासोबत आयुष्य मिळालं हे माझं केवढं मोठं भाग्य ! अशी भावना देखील या पत्रात अश्विनी जगताप यांनी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे समाजमाध्यंमांवर अनेक नागरिक यावर प्रतिक्रीया देऊन अश्विनी जगताप कुटुंबियांसोबत असल्याचे सांगत आहेत.
आपल्या लेकीबद्यल भावना व्यक्त करतांना या पत्रात अश्वीनी जगताप म्हणतात की, तुम्ही तुमच्या संस्कारांनी घडवलेली आपली खंबीर लेक, जिने आजवर मला नेहमीच खंबीर राहायला शिकवल तिच्या दुःखाचा बांध देखिल आज फुटला. शेवटी लेकचं ती.
सोबत असलेली जनता हीच खरी संपत्ती असे तुम्ही नेहमी सांगायचा आज ही तुम्ही कमावलेली संपत्ती पाहून तुमचा प्रत्येक शब्द पुन्हा आठवला.असेही त्यांनी या पत्रात नमूद करून साहेब तुम्ही आज नाहीत, मात्र मी असेल, शंकरभाऊ असतील किंवा जगताप कुटुंबातील सर्व सदस्य आमच्यात जनता तुम्हाला शोधत आहे. त्यामुळे या पत्रातून तुम्हाला एक वचन द्यावं अस वाटतं ते म्हणजे तुमचा विस्तारित परिवार, आपले चिंचवडकर यांच्यासाठी तुम्ही पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, चिंचवडच्या विकासाचा तुम्ही सुरू केलेला अश्वमेध अखंड अविरत सुरू ठेऊ. अशी ग्वाही या पत्राअंती दिली.