आहे बहारीन तरीही...

15 Feb 2023 21:23:17
Bahrain


बहारीन देशामध्ये पाल्यांनी इस्लाममध्ये सांगितलेले नियम पाळावे, यासाठी इथले पालक अगदी अतिसजग असतात, नव्हे ‘शरिया’ कायद्यामध्ये जे काही आहे, त्यानुसारच जीवन जगायचे, ही इथली पद्धत! बहारीनमध्ये सध्या अशाच एका घटनेवरून वादळ उठले. शाळेतून एका मुलाबाबत घरी तक्रारी यायच्या की, मुलगा शाळेत येत नाही, सिगारेट ओढतो. मद्यपानही करत असावा. त्याच्या पित्याला या तक्रारीमुळे राग अनावर झाला. मुलाच्या या अपराधाबद्दल पित्याने त्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारले. इतके की, काटेरी साखळीने त्याचा जीव घ्यायचाही प्रयत्न केला. बहारीनमधली ही घटना की मुलगा सिगारेट ओढतो म्हणून मुलाला जीवंत ठार मारण्याचा प्रयत्न करणारा पिता. कुठच्याही मातापित्यांसाठी मुलाचे नशेबाज असणे खूपच दुःखद म्हणा. पण, बहारीनच्या या घटनेने तिथले सामाजिक-कौटुंबिक जीवन उलगडले गेले आहे.

बहारीनमध्ये गुन्हेगारीचा स्तर कमी असला तरीसुद्धा जागतिक अभ्यासकांच्या मते, आफ्रिका किंवा युरोपियन देशातील मुली-महिलांच्या होणार्‍या मानवी तस्करीमध्ये बहारीन देशातले धनदांडगेही गुंतलेले आहेत. बाहेरील देशांतून तात्पुरत्या स्तरावर कर्मचारी भरती करायची, हे तर सगळ्याच आखाती देशात होते. देशाबाहेरील येणारे लोक बहारीन काय किंवा कुवेत काय किंवा सौदी काय, या देशाच्या आंतरिक नियम संस्कृतीबद्दल अनभिज्ञच असतात. त्यामुळे खूपवेळा या बाहेरून आलेल्या कर्मचार्‍यांना कायद्याचे उल्लंघन केले म्हणून सजेलाही सामोरे जावे लागते. बहारीनमध्येही अशा घटना घडतातच.

असो. बहारीनचा विषय निघाला, तर इथल्या संस्कृतीमध्ये ’रहस्यमय पत्नी’ हासुद्धा एक भाग आहे. आता हे काय नवीन, असे वाटू शकते. कारण, चार पत्नी असतात किंवा चार पत्नी आणि पतीसकट सगळ्या कुटुंबाची गुलामगिरी करण्यासाठी पाचवी गरिबाघरची लेकही पत्नी असू शकते. तिला धार्मिक किंवा कायदेशीर दर्जा नसतो. पण, हा ’मिस्ट्री वाईफ’ अर्थात ’रहस्यमय पत्नी’ प्रकार म्हणजे काय, तर विवाह केल्यानंतर पत्नी तिच्या आईवडिलांकडे राहते किंवा ती तिच्या स्वतंत्र घरात राहते. पतीचा तिच्यावर पूर्ण हक्क असतो. मात्र, पती तिच्यासोबत राहत नाही, तर त्याला जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा तो तिला भेटायला किंवा तिच्यासोबत राहायला जातो. अर्थात, हे तिथे मान्य असले तरी सरसकट सगळेच जण अशी पद्धत काही अवलंबत नाहीत.

‘निकाह मुताह’ ही पद्धतही सर्रास आहेच.या पद्धतीनुसार पुरूषमंडळी दूरच्या प्रवासालाप्रवासाला गेली तर त्या दरम्यान केवळ त्या काळाकरिता ते विवाह करू शकतात. या अशा पद्धतीचा बळी ठरलेल्या मुली-महिला आहेतच.प्रवास संपवून त्यांचे ते कंत्राटी पती पुन्हा गेले की, या मुलींचे काय होत असेल? काही वर्षांपासून बहारीनच्या महिला त्यांच्या अधिकारांसाठी मर्यादा पाळून आंदोलन करत आहेत. कारण, इथे परदेशी स्त्रीने बहारीनच्या पुरूषाशी विवाह केला, तर तिला सहज बहारीनचे नागरिकत्व मिळते. मात्र, बहारीनच्या स्त्रीने परदेशी पुरूषाशी विवाह केले, तर तिचे बहारीनचे नागरिकत्व संपुष्टात येते. तसेच तिच्या मुलांना बहारीनचे नागरिकत्व मिळत नाही. या कायद्याविरोधात बहारीनच्या महिलांनी आवाज उठवला आहे.
 
याच अनुषंगाने इथे बुरखा आणि महिलांबाबत किती संवेदनशीलता आहे, हेसुद्धा पाहणे गरजेचे आहे. गेल्या वर्षीच एक घटना घडली. या देशात गेले ३५ वर्षे चार शहरांमध्ये एका भारतीयाच्या मालकीची ’लॅनट्रेन’ नावाच्या हॉटेलची साखळी होती. ’लॅनट्रेन’ बहारीनमध्ये खूपच लोकप्रिय. यापैकी एका हॉटेलमध्ये सुरक्षिततेच्या कारणानुसार बुरखा घातलेल्या एका महिलेला या हॉटेलमध्ये प्रवेश मिळाला नाही. मात्र, यावरून बहारीनमध्ये वादळ उठले. ’लॅनट्रेन’ची चारही हॉटेल कायदेशीररित्या बंद करण्यात आली. इतकेच काय तर तिथे सोशल मीडियावर एक मोहीमच चालवली गेली की, भारतीय हॉटेल होते आणि हिंदू पद्धतीत बुरखा घालत नाहीत, तोच अजेंडा या हॉटेलच्या भारतीय व्यवस्थापकाने मुद्दाम चालवाला. मात्र, हॉटेल्स जरी भारतीयाच्या मालकीचे होते तरी हॉटेलचा व्यवस्थापक हा ब्रिटिश होता. असे हे बहारीनचे सामाजिक जीवन. अशा या आपल्या देशातले अनेक तरुण विशेषत: मुस्लीम तरुण बहारीनलानोकरीउदमासाठी जाण्यास उत्सुक असतात. मात्र, बहारीन म्हणजे भारत नाही, हे त्यांना थोड्याच दिवसांत कळते.
 
Powered By Sangraha 9.0