साष्टीच्या इतिहासातील `शिलाहार राजवट`

14 Feb 2023 16:18:14
 
Shilahar
 
मुंबई : भारतातील इतिहास संकलन समिती कोकण प्रांत आणि बोरीवली सांस्कृतिक विभागातर्फे एक्सर येथील वनविहर उद्यानात दरमहा सुरू असलेल्या पहिल्या पर्वातील चौथ्या गोष्टीचा भाग रविवार दि.12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता पर पडला. यावेळी धनश्री सोमन हिने वंदन गीत गाऊन कार्यक्रमास सुरुवात केली.
 
दरम्यान, प्रवीण लाडे (इतिहास संकलन समिती, २० वर्षांपासून संलग्न) आणि रविराज पराडकर (इतिहास अभ्यासक) उपस्थित होते. रविराज पराडकर हे साष्टी विषयी अभ्यासक आहेत. (छत्रपती शिवाजी महाराजांचा विशेष अभ्यास.) यावेळी पराडकर यांनी शिलाहार रजवांशांचा इतिहास सांगितला. शिलाहार वंशाची राजवट, त्यांची कारकीर्द यावेळी त्यांनी सांगितली.
 
शिलाहार साम्राज्य
 
शिलाहार म्हणजेच शेलार. शिलाहार हे क्षत्रिय मराठ्यांच आडनाव. हे राष्ट्रकूट कालखंडातील उत्तर आणि दक्षिण कोकण, दक्षिण महाराष्ट्र या भागांतील मराठा राजघराणे होते. इ.स. ९ वे ते १३ वे शतक, म्हणजे चार शतके त्यांनी राज्य केले. उत्तर कोकणचा पहिला राजा कपर्दी (८०० ते ८२५) शिलाहार वंशची तीन घराणी होती.
 
१. उत्तर कोकणचे शिलाहार
 
२. दक्षिण कोकणचे शिलाहार
 
३. कोल्हापूरचे शिलाहार
 
 
ही तिन्ही घराणी स्वतःला विद्याधर जीमूतवाहन याचे वंशज मानत. जीमूतवाहनाने एका नागाला वाचवण्याकरिता आपला देह एका दगडावर (शिलेवर) बसून गरुडाला अर्पण केला होता. म्हणून त्याच्या वंशाला शिलाहार (शिलेवरील गरुडाचा आहार) असे म्हणतात.
 
उत्तर कोकणचे शिलाहार
 
उतर कोकणचे शिलाहार हे सध्याच्या ठाणे, मुंबई,रायगड या जिल्ह्यांवर राज्य करत होते. त्यांची राजधानी 'पुरी' म्हणजेच आताचे रायगड जिल्ह्यातील दंडराजपुरी होय. कपर्दी हा या घराण्याचा मूळ पुरुष होय.
 
दक्षिण कोकणचे शिलाहार
 
दक्षिण कोकणचे शिलाहार हे सध्याच्या रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा इ. दक्षिणी कोकण प्रदेशात राज्य करत होते. त्यांची राजधानी वलीपट्टण म्हणजेच आत्ताचे रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापुर होय. सणफुल्ल हा यांचा मूळपुरुष होता.
 
कोल्हापूरचे शिलाहार
 
कोल्हापूरचे शिलाहार हे सध्याच्या कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव इ. प्रदेशांवर राज्य करत होते. त्यांची राजधानी वळीवडे (वळवडे /राधानगरी), कोल्हापूर, प्रणालक (पन्हाळा) या ठिकाणांवर होती. जतिग हा त्यांचा मूळ पुरुष होता.
 
शिलाहार हे घराणे शेवटपर्यंत राष्ट्रकूट सम्राटांशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या पतनानंतर अपराजिताने (कार. सु. ९७५–१०१०) उत्तरकालीन चालुक्य सम्राट तैलपापुढे मान न वाकवता आपल्या स्वातंत्र्याच्या निदर्शक अशा ‘पश्चिमसमुद्राधिपति’ आणि ‘मांडलिकत्रिनेत्र’ अशा पदव्या धारण केल्या. पुणक (पुणे), संगमेश्वर व चिपळूण जिंकून घेऊन आपल्या साम्राज्याची सीमा दक्षिण कोकणात व घाटावर नेली. त्याच्या ताम्रपटात त्याच्या राज्याच्या सीमा पुढीलप्रमाणे सांगितल्या आहेत
:
उत्तरेस लाट (दक्षिण व मध्य गुजरात), दक्षिणेस चंद्रपूर (गोव्यातील चांदोर), पश्चिमेस समुद्र व पूर्वेस यादव भिल्लमाच्या खानदेशातील राज्यापर्यंत. त्याने माळव्याचा परमार नृपती सिंधुराज याच्या च्छत्तीसगडातील स्वारीत आपला पुत्र पाठवून त्यास साहाय्य केले होते, असे पद्मगुप्ताच्या नवसाहसांकचरित काव्यावरून दिसते.
 
चालुक्यांना अपराजिताचे सामर्थ्य सहन होणे शक्य नव्हते. तैलपाचा पुत्र सत्याश्रय ह्याने त्याच्या प्रदेशावर स्वारी करून त्याला त्याच्या पुरी राजधानीत कोंडले. कर्नाटक कवी रन्न म्हणतो, ‘एका बाजूस सत्याश्रयाची सेना व दुसऱ्या बाजूस समुद्र यांच्या कैचीत सापडल्यामुळे अपराजिताची अवस्था जिची दोन्ही टोके जळत आहेत, अशा काठीवरील किड्यासारखी झाली’. नंतर शिलाहारांना चालुक्यांचे मांडलिकत्व स्वीकारावे लागले पण ते परमार भोजाला सहन न होऊन त्याने उत्तर कोकणावर स्वारी करून शिलाहार अरिकेसरी ऊर्फ केशिदेव याचा पराभव केला. त्यानिमित्त त्याने इ. स. १०२० मध्ये दिलेले दोन ताम्रपट सापडले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0