शिक्षक केवळ विद्यार्थी नव्हे, तर देश घडवतात : डॉ. संप्रसाद विनोद

14 Feb 2023 14:58:20
Dr. Samprasad Vinod

पुणे : “माणसाच्या आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे पालक महत्त्वाचे असतात, त्याचप्रमाणे शाळा ही अत्यंत महत्त्वाची असते. शाळेमधील शिक्षण आणि संस्कारामुळे केवळ विद्यार्थीच नव्हे तर माणसाची जडणघडण होते. कोणताही शिक्षक हा केवळ विद्यार्थी घडवत नाहीत, तर तो एक प्रकारे माणूस आणि देश घडवत असतो,” अशी भावना ज्येष्ठ योगगुरु डॉ. संप्रसाद विनोद यांनी व्यक्त केली.

‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’चे मुलांचे विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या (भावे हायस्कूल) माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन संस्थेच्या प्रांगणात करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील २० हून अधिक ज्येष्ठ माजी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. शाळा समिती अध्यक्ष आनंद कुलकर्णी, रेखा भावे गोरे, बाळकाका इंदापूरकर, मुख्याध्यापक बी.डी. शिंदे, उपमुख्याध्यापक किसन यादव, पर्यवेक्षक बाळासाहेब जायभाय, माजी विद्यार्थी प्रतिनिधी रमेश बेंद्रे, आनंद सराफ, पराग गुजराती, संकेत शिंदे, योगेश शहा उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू यांचा एकपात्री कार्यक्रम झाला.

डॉ. संप्रसाद विनोद म्हणाले, “आजच्या काळात पैशापेक्षाही ज्ञान अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे कोणताही शिक्षक हा विद्यार्थीकेंद्री असला पाहिजे आणि विद्यार्थी ज्ञानकेंद्री असला पाहिजे, तरच खर्‍या अर्थाने विद्यार्थी आणि माणूस घडू शकतो.”आनंद कुलकर्णी म्हणाले, “शाळेचा प्रत्येक विद्यार्थी हा शाळेची संपत्ती आहे. शाळा आणि विद्यार्थी यामधील संबंध कायम घनिष्ठ राहिले आहेत, ही या शाळेची आणि एक प्रकारे शिक्षकांची मोठी कमाई आहे.”

बी.डी. शिंदे म्हणाले, “ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षक हे महत्वाचे असतात त्याचप्रमाणे शाळा घडण्यासाठीही माजी विद्यार्थी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या शाळेने विद्यार्थ्यांना भरभरून दिले आहे. त्याचप्रमाणे माजी विद्यार्थ्यांनीही या शाळेला भरभरून दिले आहे. त्यामुळेच या शाळेची नाळ विद्यार्थ्यांपासून अजूनही तुटलेली नाही.”

आनंद सराफ म्हणाले, “शिक्षक हा शाळेमध्ये केवळ शिकवत नाही तर तो एक प्रकारे समाजातील पिढ्या घडवत असतो. भावे हायस्कूल या शाळेच्या मातीमध्ये देशभक्तीचा सुगंध आहे. त्यामुळे आपोआपच येथील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती भरलेली आहे.”शिक्षिका गायत्री जवळगीकर यांनी सूत्रसंचालन केले. के. के. यादव यांनी प्रास्ताविक केले.
 
वो शाम कुछ अजिब थी !

 
या अनोख्या सोहळ्याबाबत वर्णन करताना १९७३च्या बॅचचे अक्लरावी ब मधील माजी विद्यार्थी आनंद सराफ यांनी सांगितले की, “एखादी संध्याकाळ, खरोखरच आपल्या आयूष्यात अविस्मरणीय अशीच ठरते. आपले आयुष्य घडवणार्‍या शाळेच्या मैदानावर आपण बालमित्रांसह जमतो, अनेक सहकारी मनमोकळेपणे भेटतात. आठवणींने भारलेल्या वास्तूमध्ये, मनाचे अंगण होते, त्या त्या वर्गातील बाकांवर, वय विसरून बसून, आता अनुभव संपन्नतेच्या धड्यांची उजळणी होते.
 
 
शाळेच्या मैदानावर पुन्हा एकदा, जमीन आणि आकाशाच्या नात्याची उजळणी होते, बदलत्या काळाबरोबर जबाबदारीचे भानसुद्धा वाढवतात,” असे त्यांनी सांगितले.“या सोहळ्यात, सेलिब्रेटींचा धमाका नव्हता, सजावटीचा दिमाख नव्हता, होती फक्त सरस्वतीच्या उपासकांची मांदियाळी. पुस्तकातील प्रतिज्ञा इथे प्रत्यक्ष अनुभूतीस येत होती. योगगुरू संप्रसाद विनोद यांचे आशीर्वचन हाच आत्मीयतेचा कळस होता. भावे स्कूलचे मुख्याध्यापक, आजी माजी शिक्षक, सेवक, एनसीसीची टीम, शिपाई सेवक आंणि शाळा समितीचे भक्कम पाठबळ यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला,” असे आनंद सराफ यांनी सांगितले.
 

 
Powered By Sangraha 9.0