मुंबई : खार वांद्रे भागात बीबीसी वर्ल्ड सर्विस ऑफिस येथे आयकर विभागाची चौकशी. तसेच, दिल्लीतील हिंदुस्थान टाइम्स या इमारतीमध्ये जे भारताचे मुख्य ऑफिस आहे तिथेही आयकर विभागाचे अधिकारी पोहोचले आहेत. आयटीच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयावर छापे मारले असून कार्यालयातील अनेक पत्रकारांचे फोन ताब्यात घेण्यात आले आहेत. याशिवाय बीबीसी कार्यालयात येण्याजाण्यास प्रतिबंध करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
बीबीसीने गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी भाष्य करणारा एक माहितीपट प्रदर्शित केलेला आहे. या माहितीपटानंतर देशात एकच खळबळ उडाली. माहितीपटात मोदी तसेच भारताची नकारात्मक प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा दावा केला जात आहे. याच कारणामुळे या माहितीपटावर यूट्यूब तसेच ट्वीटरवर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीला झुगारून जेएनयू, दिल्ली तसेच अन्य विद्यापीठांत विद्यार्थ्यांनी या माहितपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या विद्यापीठांत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.
बीबीसीकडून आयकर कायद्याच्या नियमांचा भंग झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्राथमिक कारवाई करण्यात येत असल्याची माहिती आहे. दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ही कारवाई सूडबुद्धीनं करण्यात आल्याचं म्हटलं आहे.