२०२४ साठी महाराष्ट्र भाजपचा 'महाविजय संकल्प'

11 Feb 2023 20:59:05
Maharashtra BJP's 'Mahavijay Sankalp' for 2024


मुंबई
: सातत्याने पक्षकार्य आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवणाऱ्या भाजपकडून आता नव्या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. नाशिक येथे पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदेशाच्या कार्यकारिणीत दीड वर्षानंतर होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा आणि वर्षभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी 'महाविजय संकल्प २०२४' या नव्या अभियानाची घोषणा करण्यात आली आहे.

शुक्रवार, दि. १० फेब्रुवारी आणि शनिवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी अशा दोन दिवसांत नाशिक येथे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी झालेल्या चर्चा आणि मांडलेल्या ठरावाच्या नंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी घोषणा केली आहे. 'महाविजय २०२४' म्हणून भाजपकडून नव्याने एक संकल्प घेण्यात आला असून त्याअंतर्गत लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक तर विधानसभेच्या २०० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजपकडून समोर ठेवण्यात आले आहे.


श्रीकांत भारतीयांच्या खांद्यांवर निवडणूक संयोजक पदाची धुरा


लोकसभा आणि विधानसभेच्या अनुषंगाने आखणी करण्यात आलेल्या या महाविजय २०२४ अभियानाच्या प्रदेश संयोजक पदाची धुरा भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांच्या खांद्यांवर देण्यात आली आहे. श्रीकांत भारतीय यांच्या पाठीशी संघटनात्मक बांधणी, बूथ पातळीपर्यंत काम करण्याचा अनुभव आणि ओघवत्या वक्तृत्वशैली या जमेच्या बाजू आहेत. तसेच भारतीय हे देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून परिचित असून राज्यातील अनेक राजकीय घडामोडींमध्ये त्यांनी पक्षाच्या सूचनेप्रमाणे महत्त्वाची भूमिका देखील बजावलेली आहे.


 
Powered By Sangraha 9.0