पालघर : ‘सेवा विवेक’ सामाजिक संस्थेमार्फत पालघर जिल्हातील दुकटन गावातील बांबूपासून हस्तकला प्रावीण्य मिळवलेल्या वनवासी महिलांना संविधान साक्षरता मोहिमेंतर्गत संविधानाचे महत्त्व व फायदे याचे मार्गदर्शन ‘सेवा विवेक’चे मार्गदर्शक, जेष्ठ विचारवंत, लेखक आणि राष्ट्रीय स्वयम् सेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते ‘पद्मश्री’ रमेश पतंगे यांनी दिले. या उपक्रमात ‘पद्मश्री’ पतंगे यांच्या धर्मपत्नी मधुरा पतंगेही उपस्थित होत्या.
‘पद्मश्री’ रमेश पतंगे यांनी दुकटन गावातील उपस्थित महिलांना ‘संविधान साक्षरता मोहिमें’तर्गत संविधानाचे महत्त्व व फायदे याचे मार्गदर्शन केले. यावेळी महिलांना संविधानातून मिळालेल्या हक्काचे महत्त्व त्यांना पटवून दिले. संविधान हा सर्वोच कायदा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचे कायदे शब्दांत बांधून ठेवले देश कोणी घडवला, तर तो व्यास वाल्मिकी आंबेडकर यांनी घडविला अशी संविधानातील संरक्षणात्मक व विविध माहिती महिलांना दिली.
संविधानाने महिलांना दिलेल्या विविध अधिकाराची माहिती व ते अधिकार कसे वापरावे, याची माहिती ‘पद्मश्री’ पतंगे यांनी महिलांना दिली. अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य तसेच उत्तम शिक्षण घेण्याचे अधिकार आपल्या सर्वना संविधानाने दिले आहेत. संविधानाचे महत्त्व पटवून देताना ‘पद्मश्री’ पतंगे यांनी सांगितले धर्म जगावा लागतो तसे संविधान जगावे लागते, धर्मांचे रक्षण केले तर धर्म आपले रक्षण करतो, तसेच संविधानाचे रक्षण केले तर संविधान आपले रक्षण करते. या वेळी ‘पद्मश्री’ पतंगे यांनी आदिवासी महिलांना संविधान साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले तसेच महिलांनी ‘संविधान’ या पुस्तकाचे वाचन करावे, असा मोलाचा सल्ला दिला.
‘सेवा विवेक’ सामाजिक संस्थेची बांधिलकी
‘सेवा विवेक’ सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील वनवासी गरुजू महिलांना घर काम सांभाळून त्यांना आर्थिक हातभार लाभावा त्यांना सन्मान जनक रोजगार प्राप्त व्हावा, यासाठी कार्यरत आहे.त्याअंतर्गत वनवासी महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात येत असून आतापर्यंत शेकडो हून अधिक महिलांनी प्रशिक्षण देण्यात आले आहे. वस्तू तयार करण्यासाठी कच्चा माल संस्थेच्यावतीने दिला जातो, तर तयार झालेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी बाजारपेठ संस्थेने उपलब्ध करुन दिली असून या वस्तूंच्या विक्रीतून वनवासी महिलांना चांगले उत्पन्न मिळत आहे. आता या वस्तू ऑनलाईन बाजारात उपलब्ध होणार असल्यामुळे या वनवासी महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे.
हल्ली ऑनलाईन पध्दतीने वस्तूंची देवाणघेवाण केली जाते. या मागणीचा थेट परिणाम पालघर जिल्हातील वनवासीमहिलांचा रोजगार निर्मितीवर होत असून त्यांना प्रशिक्षणानंतर घरच्या घरी रोजची कामे सांभाळून बांबू काम करून रोजगाराची मोठी संधी प्राप्त झाली आहे. चांगला रोजगार प्राप्त होत असल्यामुळे महिला आपल्या संसाराला हातभार लावत असून मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षणही देत आहेत.