मुंबई : वर्धा येथे होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी या महिन्यात होणाऱ्या इतर साहित्य संमेलनांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. दैनिक मुंबई तरुण भारतला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी जिल्हा पातळीवर अशी अनेक संमेलने भरावीत अशीही इच्छा व्यक्त केली आहे.
अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे व्यासपीठ उपलब्ध असताना इतरही अनेक संमेलने होतात. मुस्लिम मराठी संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन, मराठवाडा साहित्य संमेलन याचग काळात होतात. हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अपयश आहे असे वाटते का असा प्रश्न विचारला असता त्यांचे उत्तर वाखाणण्याजोगे होते.
चपळगावकर म्हणाले, "वेगवेगळी साहित्य संमेलने भरणे यात चुकीचे काही नाही. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे व्यासपीठ आपल्याला अपुरे पडते आहे आणि आपण वेगळे संमेलन करावे असे वाटणे अयोग्य नाही. अशा वेगवेगळ्या गटांच्या किंवा प्रादेशिक विभागांच्या, संमेलनात जर मराठी साहित्याच्या आजच्या स्वरूपाबद्दल गंभीर चर्चा झाली तर त्यामुळे साहित्य चर्चेला मदतच होईल. यानिमित्ताने अनेक लेखकांनाही आपले म्हणणे मांडता येईल. यादृष्टीने अगदी जिल्हा पातळीवरचे संमेलनेसुद्धा उपयुक्त होऊ शकतील. त्याचे कार्यक्रम ठरवताना मात्र ते वाचकांना आणि श्रोत्यांना त्यांची वाङ्मयाभिरुची वाढवणारे असावेत याचा विचार केला पाहिजे."
साहित्याचा आणि अभिव्यक्त होऊ पाहणाऱ्या लेखकांचा विचार करणारे नरेंद्र चपळगावकर साहित्यालाही न्याय देतील अशी आशा आहे. साहित्य संमेलनासाठी आजच संभाजीनगरहून चपळगावकर वर्ध्याला आपली पत्नी आणि लेकीसोबत निघाले आहेत. त्यांच्या अध्यक्षीय भाषणाची उत्सुकता मात्र लागून राहील.