हत्तीचे पुन्हा आगमन झाल्याने सिंधुदुर्गमध्ये दहशत

शेतीचे नुकसान होण्याच्या भीतीमुळे घबराट

    01-Feb-2023
Total Views |

elephant


मुंबई (प्रतिनिधी):
गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले हत्ती सिंधुदुर्ग परिसरात पुन्हा दिसू लागल्याने, स्थानिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. विशेष करुन हत्तींमुळे शेती उद्ध्वस्त होत असल्याने बळीराजा चिंतीत आहे.

सिंधुदुर्गमध्ये दि. १४ जानेवारीपासून अधूनमधून हत्तीचे दर्शन होत आहे. या हत्तीकडून शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच हत्तींमुळे स्थानिकही धास्तावले आहेत.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात गेलेले हत्ती आता पुन्हा सिंधुदुर्गमध्ये आलेत की काय अशी शंका निर्माण होत आहे. तूर्त येथील नागरिकांना केवळ एकच हत्ती आढळला आहे. या हत्तीचे पुन्हा आगमन झाल्याने सिंधुदुर्गमध्ये दहशत
हत्तींकडून तिलारी संवर्धन राखीव क्षेत्रातील गावांमध्ये शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. यामध्ये प्रामुख्याने नारळ, भातशेती, केळी, काजू, बांबू, सुपारी आदी पिकांचा समावेश आहे. वास्तविक या कालावधीत फणसाचा हंगाम असतो. मात्र, यंदा तो लांबला आहे. येथे येणारे हत्ती या हंगामातच विशेष करुन येतात. कारण, या हंगामात ते आपल्या पिल्लांना घेऊन फणसावर ताव मारतात.

या परिसरात गेल्या चार महिन्यांत एकही हत्ती आढळला नव्हता. मात्र, आता तो पुन्हा आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. एकदा या परिसरात शिरकाव झालेला हत्ती किमान सहा ते सात महिने येथेच मुक्कामास राहतो, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्या कालावधीत हत्तीकडून शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असल्याने हत्तीचा बंदोबस्त करण्याबरोबरच त्याच्यामुळे होणार्‍या वाढीव नुकसान भरपाईचा प्रस्ताव वनविभागाने मंजूर करावा, अशी मागणीही स्थानिकांकडून केली जात आहे.
सिंधुदुर्गमध्ये हत्ती आढळल्याचे येथील वनधिकारी अरुप कन्नमवार यांनी मान्य केले असून त्या हत्तींकडून नुकसान होत असल्याचेही ते म्हणाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.