ध्येयनिष्ठ वन्यजीव संशोधक

    01-Feb-2023   
Total Views |
Wildlife researcher Mandar Sawant
 

‘केमिकल इंजिनिअरिंग’ ते ‘बीएनएचएस’मध्ये ‘नॅचरल एक्सप्लोरिस्ट’ म्हणून वन्यजीव क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या मंदार सावंत यांच्या अद्भुत प्रवासाविषयी...


मंदार सावंत यांनी दहावीची परीक्षा झाल्यानंतर विज्ञान क्षेत्राची वाट चोखाळली. ‘केमिकल इंजिनिअरिंग’मध्ये त्यांनी पदविका पूर्ण केली खरी. पण, मंदार यांना लहानपणापासूनच तशी वन्यजीवांची आवड आणि फोटोग्राफीचाही छंद जडलेला. हे लक्षात घेता, त्यांनी ‘अ‍ॅनिमल वेलफेअर’सोबत प्राण्यांसाठी काम करण्यास सुरुवात केली. तसेच सर्पमित्र म्हणून काम करत असताना प्राण्यांचा बचाव (अ‍ॅनिमल रेस्क्यू) करण्याचे कामही सुरू केले. त्यांचे हे काम सात वषेर्र् जोमाने सुरू होते. जखमी प्राणी-पक्ष्यांवर औषधोपचार करणे, त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडणे, ही कामे सुरुवातीच्या काळात मंदार यांनी केली. ‘पॉज’ या ‘एनजीओ’मध्ये स्वयंसेवक म्हणून काम करत असताना ‘सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक’ म्हणूनही त्यांचा गौरव करण्यात आला. याच कालावधीत एक मांजर सात फूट खोल विहिरीमध्ये पडले होते. त्याचे बचावकार्य केल्यामुळे ‘पेटा’ या आंतरराष्ट्रीय ‘एनजीओ’ कडूनही ’हिरो टू अ‍ॅनिमल्स’ या पुरस्काराने मंदार यांना गौरविण्यात आले.


‘बटरफ्लाय मॅन’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या आयझॅक केहीमकर यांच्या पुढाकाराने २०१२ साली मंदार यांनी फुलपाखरांवर लिहिलेला एक वैज्ञानिक ‘टीप’ ‘बीएनएचएस’च्या ‘जर्नल’ मध्ये प्रसिद्ध झाली. पुढे २०१५ साली ‘बीएनएचएस’चे संचालक म्हणून दीपक आपटे यांच्याशी मंदार यांची ओळख झाली. मंदार यांचे लेखन आणि संशोधनकार्य लक्षात घेता, आपटे यांनी त्यांना नोकरीची संधी देऊ केली आणि ही खरंतर मंदार यांच्या आयुष्यातली एक सुवर्णसंधीच ठरली. आयुष्यातील पहिली नोकरी आणि तीही ‘बीएनएचएस’सारख्या प्रतिष्ठित संस्थेत आणि आवडत्या कामासाठी मिळणार, या कल्पनेनेच मंदार अक्षरश: भारावून गेले. पण, यावेळी त्यांनी विनम्रपणे इथे काम करण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण माझ्याकडे नाही, असे सांगितले. मात्र, पदवी नसली तरी अभ्यास, अनुभव आणि आधी केलेल्या कामाच्या जोरावर त्यांना दीपक आपटे यांनी ’नॅचरलिस्ट एक्सप्लोरर’ या नवनिर्मित पदावर रुजू होण्यास सांगितले. याच पार्श्वभूमीवर दि. २ ऑक्टोबर, २०१७ साली मंदार सावंत यांनी ‘बीएनएचएस’मध्ये कामाला सुरुवात केली. ‘बीएनएचएस’च्या या प्रवासात त्यांनी विविध नवीन गोष्टी शिकण्याबरोबरच अनुभवांची शिदोरीही गोळा केली.


‘बीएनएचएस’मध्ये कार्यारंभानंतर सुरुवातीच्या काही दिवसांतच मंदार यांना एका वैयक्तिकप्रकल्पासाठी अरुणाचल प्रदेशला भेट देण्याची संधी मिळाली. या दौर्‍यात अरुणाचल प्रदेशमधील पाच प्रजाती भारतात आणल्या गेल्या आणि आज त्या पाचही प्रजाती मंदार यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. नोंदणीकृत असलेल्या या प्रजातींमध्ये दोन साप, दोन पाली आणि एक वनस्पती अशा पाच प्रजातींचा समावेश आहे. त्यांनी या कामानंतर अतिउंचीच्या पठारांवरही संशोधनात्मक काम सुरू केले.याबरोबरच पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधूनही नऊ वर्षांच्या शोधकार्यानंतर फुलपाखरांच्या १४० प्रजातींची नोंद केली गेली. १२५ वर्षांपूर्वी इंग्रजांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात अहवाल जमवून प्रसिद्ध करण्यात आला. फुलपाखरांविषयीचा हा शोधनिबंधही त्यांनी २०२० मध्ये म्हणजेच कोरोना काळातील पहिल्या टाळेबंदीत प्रसिद्ध केला.


वन्यजीव छायाचित्रणाची आवड असल्यामुळे जंगलामध्ये भटकणं, फोटो काढणं याबरोबरच तिथे आढळणार्‍या वेगवेगळ्या प्रजातींची माहिती ठेवणं, हे काम सुरू होतं. “मध्यमवर्गीय घरातून येणार्‍या मंदार यांची या क्षेत्रातील आवड लक्षात आल्यानंतर घरच्यांपासून नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनीच त्यांना विरोध केला. पण, कामाला सुरुवात झाल्यानंतर हळूहळू घरच्यांचा आणि इतरांचा पाठिंबा मिळत गेला,” असं ते नमूद करतात.


पदविकेपर्यंतचे शिक्षण झालेले, पण आज स्वतःच्या पायावर आणि एका वेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे मंदार शिक्षणाबाबतचा आजच्या तरुणपिढीला सल्ला देताना म्हणतात की, “शिक्षण खूप गरजेचे आहे. फक्त ते तुमच्या आवडत्या क्षेत्रात घ्या आणि त्यात काम करा म्हणजे जास्त चांगलं काम करता येईल,” असं आवर्जून सांगतात.वन्यजीव क्षेत्राच्या आवडीतून निर्माण झालेल्या या कामाबरोबर फुलपाखरांवर त्यांचा सखोल अभ्यास आहे. तसेच, आता त्यांचे बुरशी आणि मशरूम्स या विषयांवर गेल्या पाच महिन्यांपासून संशोधनात्मक कार्य सुरू आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मनःपूर्वक शुभेच्छा...!





-समृद्धी ढमाले



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.