वेलकम टू साईलीला

    01-Feb-2023
Total Views |
Welcome To Saileela Foundation


अर्थात, साईंच्या लीलेमध्ये आपले स्वागत आहे. मुंबई ते शिर्डी साईनाथांची पायी वारी करणारे काही साईभक्त आपण समाजाला काही देणं लागतो म्हणून वैयक्तिक जीवनात समाजसेवा आणि दानधर्म करुन साईबाबांची शिकवण अंमलात आणायचा प्रयत्न करत असतात. परंतु, या साईभक्तांना आपल्या परीने काम करत असताना आपण कुठेतरी कमी पडतोय किंवा आपली मदत पुरेशी नाही, अशी मनात एक खंत आणि जाणीव झाली होती, ही बाब त्यांच्या मनात घर करून होती.
 
आपल्यासारखे समविचारी आणि आपले ध्येय, विचार पटणारी माणसे एकत्र आली आणि एकत्रितपणे आपण समाजकल्याणाचा विडा उचलला आणि बेलभंडारा उधळला, तर भरीव मदत करता येईल.चांगल्या परीने काम होईल आणि मनुष्यबळदेखील वाढेल, अशी भावना त्यांच्या मनात उत्पन्न झाली. मदत किंवा समाजकल्याण फक्त आर्थिक दृष्टीने होत नाही, तर आधार, आरोग्यसेवा, दैनंदिन मदत किंवा आश्रयानेसुद्धा करता येईल, अशी एक संकल्पना डोक्यात आली आणि इथेच घडली एक साईलीला.

समाजात काम करत असताना अनेक कायदेशीर गोष्टींचा सामना करावा लागतो. हे लक्षात घेऊन सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून धर्मदाय आयुक्तांची मान्यता घेऊन दि. २६ जानेवारी रोजीचा मुहूर्त साधून या साईभक्तांनी सन्माननीय शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्या हस्ते ‘वेलकम टू साईलीला फाऊंडेशन’चा शुभारंभ केला.सदर कार्यक्रमाला अनेक दिग्गज मंडळींनी उपस्थिती दर्शविली. नगरसेवक अनिल कोकीळ, ‘बेस्ट’ कामगार सेना सरचिटणीस रंजन चौधरी, माजी नगरसेवक पराग विठ्ठल चव्हाण, शाखाप्रमुख किरण तावडे, महिला शाखा संघटक भारती पेडणेकर यांनी आवर्जून उपस्थिती लावली.

यावेळी समाजात कौतुकास्पद कामगिरी करणार्‍या तसेच सरकारी कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला, आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ येथे १४ वर्षांखालील मुला-मुलींना प्रशिक्षण देणार्‍या तसेच दिग्गज खेळाडू घडविणारे प्रफुल्ल गडहिरे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच महानगरपालिका कर्मचारी विवेकानंद देसाई, रेल्वे कर्मचारी सुरेश सावंत व प्रसिद्ध पार्श्वगायक साईभजनातील एक अनोखे रत्न राजेश रणशूर, ज्येष्ठ नागरिक अमिर वाघू इत्यादी मंडळींना गौरविण्यात आले.मुंबईत कर्करोगासाठी प्रसिद्ध असणार्‍या टाटा रुग्णालय येथे उपचार घेणार्‍या रुग्णांसाठी राहण्याची आणि खाण्याची सोय संस्था करत असते व सुमारे तीन हजार माणसांना केईएम रुग्णालय येथे भोजनदान करण्याचे कामदेखील संस्था करत असते.


तसेच कोकण, कोल्हापूर येथे झालेल्या पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी तेथील स्थानिक रहिवाशांना बळ देण्याचे काम आमदार अजय चौधरी यांच्या मदतीने संस्थेने केले आहे व असे आकस्मित प्रसंग उद्भवल्यास संस्था त्यासाठी सज्ज असते.कोरोना महामारीच्या काळातदेखील स्थानिक पातळीवर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका व वैद्यकीय प्रशासनाशी संलग्न राहून अनेक समाजोपयोगी कार्य केले आहे, यासाठी अनेक संस्थांनी व महानगरपालिका प्रतिनिधींनी संस्थेच्या कार्यकर्त्यांचा गौरवसुद्धा करण्यात आला. तसेच अनाथआश्रम, वृद्धाश्रम व समाजात मागास असलेले रहिवासी यांनादेखील सोईसुविधा पुरवण्याचे काम संस्थेने केलेले आहे. तसेच प्रजासत्ताक दिन व ‘वेलकम टू साईलीला फाऊंडेशन’च्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस पदक विजेते पीएसआय मधुकर शिंगटे यांचा व पोलीस दलातील कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात आला आणि अशीच घोडदौड आणि समाजकल्याणाचे कार्य संस्था अधिक प्रयत्नशील आणि बळकट करणार आहे.


 
-सिद्धेश वालावलकर



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.