राष्ट्रीय छात्रसेनेच्या माध्यमातून विद्यार्थी दशेत राष्ट्रभक्ती दृढ होण्यास मदत - क्रीडा मंत्री गिरीश महाजन

01 Feb 2023 18:05:48
 Girish Mahajan
मुंबई : विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. राष्ट्रीय छात्रसेनेच्या मध्यामातून विद्यार्थी दशेत एकता, शिस्त व राष्ट्रभक्ती दृढ होण्यास मदत होत असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. प्रजासत्ताक दिनाच्या नवी दिल्ली येथील संचलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या १२५ छात्रसेनेच्या चमूचा सन्मान आज मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी केला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आरोग्य मंत्री प्रा.तानाजी सावंत, जामनेर नगराध्यक्ष साधना महाजन, सिनियर अंडर ऑफिसर देवेंद्र बडगुजर, संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय.पी.खंडुरी हे उपस्थित होते.
 
गिरीश महाजन म्हणाले की, छात्रसेना संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेतेपद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाने केलेली कामगिरी अतिशय दिमाखदार आहे. भविष्यातही अशीच कामगिरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करत शासनाच्यावतीने सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. मी सुद्धा एनसीसीच्या माध्यमांतून विद्यार्थी दशेत सहभागी होतो, अशी आठवण या निमित्ताने मंत्री महाजन यांनी विद्यार्थ्यांना सांगितली.

यावेळी आरडीसी कन्टिजंट अधिकारी म्हणून फर्ग्युसन महाविद्यालयातील एनसीसी आधिकारी लेफ्टनंट डॉ.नंदकुमार बोराडे तसेच आरडीसी कन्टिजंट कमांडर कर्नल निलेश पाथरकर यांचा सत्कार मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.


Powered By Sangraha 9.0