अनिल परब तो झाकी हैं, मातोश्री २ अभी बाकी हैं!

01 Feb 2023 19:21:26
Nitesh Rane's warning to Thackeray


मुंबई : 'उद्धव ठाकरेंमध्ये बोलायची हिम्मत नाही म्हणून त्यांनी अनिल परबांच्या रूपाने एक कारकून ठेवला आहे आणि तो कारकून राणेंवर टीका करतो. इतरांच्या घरांवर विनाकारण तोडक कारवाई करण्याचे आणि इतरांना विनाकारण अटक करण्याचे उद्योग करणाऱ्यांवर एक ना एक दिवस ही वेळ येणारच होती. आज जेव्हा अनिल परबांच्या ऑफिसवर कारवाई झाल्यावर ते आमच्यावर टीका करता आहेत, पण त्यांनी लक्षात ठेवावे की अनिल परब यांच्या कार्यालयावरील कारवाई तो झांकी हैं, क्योंकी मातोश्री २ वरील कारवाई अभी बाकी हैं,' असा गर्भित इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि अनिल परबांना दिला आहे.

त्यांचा असा पाहुणचार करू की...
नितेश राणे म्हणाले की, 'अनिल परब यांच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईमुळे ठाकरे गट अस्वस्थ आहे. अनिल परबांनी आमचे घर देखील अनधिकृत असून त्यावर कारवाई करावी आणि त्या कारवाईवेळी आपण तिथे उपस्थित असू असे म्हटले आहे. त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी कारवाईची तारीख आणि वेळ सांगावी, आम्ही त्यांचा असा पाहुणचार करू की परत नारायण राणेंवर आरोप करताना आणि आमच्या घराकडे वाकड्या नजरेने बघण्यापूर्वी त्यांना विचार करावा लागेल,' अशा इशारा त्यांनी परबांना दिला आहे.

मातोश्री २ मधील अनियमितता बाहेर येईल !
अनिल परभणी दिलेल्या आव्हानाला प्रतिआव्हान देताना नितेश राणे म्हणाले की, 'न्यायालयाच्या आदेशाची वाट न बघता पहाटे पहाटे कंगना रानौतचे घर पाडणाऱ्यांवर आणि नारायण राणेंसारख्या केंद्रीय मंत्र्याला काहीही कारण नसताना अटक करणाऱ्यांवर एक ना एक दिवस नियती ही वेळ आणणारच होती. उद्धव ठाकरेंमध्ये काहीही करण्याची हिम्मत नाही म्हणून अनिल परबांसारखी मंडळी राणेंवर टीका करायला सोडलेली आहेत. आमच्या घरावर बोलण्यापूर्वी त्यांनी मातोश्री २ मध्ये किती अनियमितता आहेत ? याचा विचार करावा. शिल्लक राहिलेल्या सेनेच्या शिवसैनिकांना जिथे साधा प्रवेशही दिला जात नाही अशा मातोश्री २ च्या बांधकामात किती अनधिकृत कामे करण्यात आली आहेत याचा माहिती अनिल परबांनी घ्यावी. त्यामुळे जेव्हा मातोश्रीवर २ वर हातोडा पडेल तेव्हाच ठाकरे आणि परबांना इतरांच्या घरावर कारवाई केल्यावर काय वेदना होतात याची जाणीव होईल,' असे राणेंनी म्हटले आहे.



Powered By Sangraha 9.0