वंचितांना सक्षम करणारा अर्थसंकल्प : पंतप्रधान नरेंद्र मोदी

विकसित भारताचा मजबूत पाया रचण्यास प्रारंभ

    01-Feb-2023
Total Views |
Narendra Modi


नवी दिल्ली
: देशाच्या अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प विकसित भारतासाठी मजबूत पाया रचणारा ठरणार आहे. या अर्थसंकल्पात वंचितांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या अर्थसंकल्पात आजच्या आकांक्षी समाजातील गरीब, शेतकरी, महिला, युवक आणि मध्यमवर्गीयांची स्वप्ने पूर्ण करण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले आहे.


अतिशय वेगाने बदलणाऱ्या समृद्ध आणि विकसित भारताची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मध्यमवर्ग ही मोठी शक्ती आहे. मध्यमवर्गीयांना सशक्त करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत अनेक निर्णय घेतले आहेत आणि जीवनात सुलभता सुनिश्चित केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गियांचा आशा – आकांक्षा पूर्ण करण्यास विशेष प्राधान्य देण्यात आले आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले.

हा अर्थसंकल्प हरित विकास, हरित अर्थव्यवस्था, हरित ऊर्जा, हरित पायाभूत सुविधा आणि शाश्वत भविष्यासाठी हरित नोकऱ्यांना अभूतपूर्व विस्तार देणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, अर्थसंकल्पात तंत्रज्ञान आणि नवीन अर्थव्यवस्थेवर भर दिला आहे. आकांक्षी भारताला आज रस्ते, रेल्वे, मेट्रो, बंदर, जलमार्ग अशा प्रत्येक क्षेत्रात आधुनिक पायाभूत सुविधा हव्या आहेत. त्यासाठी २०१४ च्या तुलनेत पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक ४०० टक्क्यांहून अधिक वाढली आहे. पायाभूत सुविधांवर १० लाख कोटींची अभूतपूर्व गुंतवणूक भारताच्या विकासाला नवी ऊर्जा आणि गती देईल.


या गुंतवणुकीमुळे तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, मोठ्या लोकसंख्येला उत्पन्नाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. या अर्थसंकल्पात इज ऑफ डुइंग बिझनेस सोबतच आपल्या उद्योगांसाठी क्रेडिट सपोर्ट आणि सुधारणांची मोहीम पुढे नेण्यात आली आहे. एमएसएमईसाठी २ लाख कोटी रुपयांच्या अतिरिक्त कर्ज हमीची व्यवस्था करण्यात आली आहे. आता अनुमानित कराची मर्यादा वाढवल्याने एमएसएमई वाढण्यास मदत होणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.


शहरी महिलांपासून ते खेडेगावात राहणाऱ्या महिलांपर्यंत, व्यवसायात व्यस्त असलेल्या महिला किंवा घरगुती कामात व्यस्त असलेल्या महिलांपर्यंत, त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी सरकारने गेल्या काही वर्षांत अनेक पावले उचलली आहेत. महिला बचत गटांनी, एक अतिशय शक्तिशाली क्षेत्र, आज भारतात खूप मोठी जागा संपादन केली आहे, त्यांना थोडे बळ मिळाले तर ते चमत्कार करू शकतात. आणि म्हणूनच महिला बचत गट, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवा उपक्रम या अर्थसंकल्पाला नवा आयाम देणार आहे. महिलांसाठी विशेष बचत योजनाही सुरू करण्यात येत आहे.आणि जन धन खात्यानंतर ही विशेष बचत योजना सर्वसामान्य कुटुंबातील गृहिणी माता-भगिनींना मोठे बळ देणार आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले. 


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.