टायरी निकोल्सचा मृत्यू आणि...

    01-Feb-2023   
Total Views |
 Murder of Tyree Nichols

त्यांच्या मते, त्याने वाहतुकीचा नियम तोडला होता. काळजी न घेता वाहन चालवले होते. त्याला त्याच्या गाडीतून खेचून बाहेर काढत ते त्याच्याशी उर्मटपणे बोलू लागले. त्यावेळी तो म्हणाला, “पण, मी काहीच केले नाही.” त्याने उलट उत्तर दिले म्हणून त्यांचा पारा चढला. अतिशय निर्दयपणे ते त्याला मारू लागले. त्याच्यावर पेपर स्प्रे फवारला आणि ‘तुला मारून टाकू,’ अशी धमकी ते त्याला देऊ लागले. रात्रीचे ८.२५ वाजले होते. आपला ते खूनच करतील, या भीतीने तो जीवाच्या आकांताने कसाबसा त्यांच्या तावडीतून सुटला अन् पळू लागला. त्याच्या पाठी दोघे जण त्याला पकडायला पळू लागले आणि काही मिनिटांतच सगळ्यांनी मिळून त्याला पकडले.

जमिनीवर झोपायला लावून अक्षरशः जराही दया-माया न दाखवता, त्याला मारहाण सुरू केली. “कोणी तरी मला वाचवा, खरंच मी काही केले नाही,” असे तो म्हणत राहिला. शेवटी तो अर्धमेला झाला. निपचित होऊन पडला. मग अर्ध्या तासाने रुग्णवाहिका आली आणि त्याला रुग्णालयात भरती केले गेले. तीन दिवस उपचार सुरू होते. मात्र, तीन दिवसांनंतर भयंकर वेदनांच्या असह्य यातनांनी त्याचा मृत्यू झाला.

तो २९ वर्षांचा तरुण टायरी निकोल्स होता. त्याचे आई-वडील आणि त्याला एक चार वर्षांचा मुलगा आहे. ही घटना आहे ७ जानेवारी ते १० जानेवारी या काळातली. अमेरिकेतल्या टेनेसी प्रांतातील मेम्फ़िस शहरामधील. निकोल्सला क्रूरपणे मारहाण करणारे पोलीस होते स्कॉर्पियन स्क्वाडमधले पोलीस-टैडेरियस बीन, डेमेट्रियस हेली, डेसमंड मिल्स जूनियर, एम्मिट मार्टिन आणि जस्टिन स्मिथ.

निकोल्सचा मृत्यू नव्हे, तर एक प्रकारचा खूनच आहे, असे म्हणत अमेरिकेतील जवळजवळ सर्वच शहरांत लोक रस्त्यावर उतरले. २०२० साली अश्वेतवर्णीय फ्लॉएड याचाही पोलिसांच्या अशाच क्रूर मारहाणीत मृत्यू झाला होता. तेव्हा त्याला मारणारे पोलीस श्वेतवर्णीय होते. त्यामुळे त्या प्रकरणाला ‘ब्लॅक व्हर्सेस व्हाईट’ असे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यानंतर अमेरिकेमध्ये अराजकता निर्माण होणार असेच वाटत होते. पण, त्यानंतर अमेरिकन प्रशासनाने परिस्थिती नियंत्रित केली. आपल्याकडे जसे जातपात पाहून आंदोलने करायची की नाही, ते जसे ‘डफली गँग’ ठरवते तसेच चित्र अमेरिकेतही. श्वेत-अश्वेतवर्णीय या आयामात घटनांचा मागोवा घेत हिंसक आंदोलन करणारी लोकं तिथेही आहेतच. त्या पाश्वर्र्भूमीवर क्रूरपणे मृत्यू झालेला टायरी निकोल्स आणि त्याला मारणारे पाच पोलीस हे सगळेच अश्वेतवर्णीय आहेत. त्यामुळे निकोल्सच्या मृत्यूनंतर अमेरिकेत जरी आंदोलनं होत असली तरी ती शांततेच्या मार्गाने होत आहेत.

असो. मात्र, निकोल्सच्या मृत्यूनंतर ‘जॉर्ज फ्लॉएड जस्टिस इन पुलिसिंग अ‍ॅक्ट’ त्वरित पारित करावा आणि त्याची अंमलबजावणी करावी, ही मागणी जोर धरत आहे. पोलिसांनी गळा दाबला म्हणून फ्लॉएडचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी हिसंक पद्धधतीने मारहाण किंवा गळा दाबण्याविरोधात कायदा पारित करण्याच्या दृष्टीने अमेरिकन संसदेमध्ये ‘जॉर्ज फ्लॉएड जस्टिस इन पुलिसिंग अ‍ॅक्ट’ मांडण्यात आले. पण, सत्तांतरानंतर या विधेयकाला बासनात गुंडाळण्यात आले.त्यानंतर निकोल्सचा मृत्यू झाल्याने पोलिसांच्या हिंसक कारवाईवर आणि मानसिकतेवर पुन्हा प्रश्न उठू लागलेत. ‘सिव्हिल राईट्स समूहा’चे ‘एनएएसीपी’चे अध्यक्ष डेरिक जॉनसनने पण अमेरिकन संसदेला या कायद्याबाबत तातडीने पावले उचलण्याचा आग्रह केला आहे.


मात्र, अमेरिकी संसद न्याय समितीचे अध्यक्ष आणि रिपब्लिकन पार्टीचे नेता जिम जॉर्डन यांचे म्हणणे की, हा कायदा घाईगडबडीत बनवू नये. दुसरीकडे इथल्या प्रशासनाने तडकाफडकी ‘स्कॉर्पियन स्क्वाड’ बरखास्त केले. कारण, निकोल्सला मारहाण करणारे पोलीस या ‘स्क्वाड’चे पोलीस होते.कोरोना काळात ऑक्टोबर २०२१ साली शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने हे विशेष दल स्थापन केले होते. शहरात होणारे गुन्हे खासकरून शस्त्र दाखवून होणारी लूट, हिंसा हे थांबवणे या दलाचे काम होते. निकोल्सच्या मृत्यूने या विशेष दलावर असंख्य प्रश्नचिन्ह निर्माण झाले. संरक्षण आणि सेवा हे अमेरिकन पोलिसांचे ब्रीदवाक्य. त्याला निकोल्सच्या मृत्यूमुळे काळीमा फासला गेला. या निकषावर अमेरिका असो की जगाच्या पाठीवरचा कोणताही देश, पोलीस प्रशासन आणि समाज यांचे नाते कसे आहे, हे तपासणे खरेच गरजेचे आहे.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.