Budget 2023 : अर्थसंकल्पातून समाजातील प्रत्येक घटकाला दिलासा !

    01-Feb-2023
Total Views |
 
Budget 2023 Budget 2023
 
ठाणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्षाचा म्हणजेच २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांच्या पिटाऱ्यातून आशा निघणार की निराशा याकडे सर्वांचे लक्ष्य होते. सर्वसामान्यांसाठी काय असणार? असा प्रश्नही अनेकांच्या मनात होता. यावेळी त्यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या.
 
दरम्यान, या वर्षात काय महाग, काय स्वस्त? यासंबंधी अधिक माहिती दिली. तर, इलेक्ट्रिक वाहने स्वस्त, चांदी आणि इमिटेशन ज्वेलरी महाग, सिगारेट महागणार, सीफूड स्वस्त, प्राप्तिकर सवलत मर्यादा 3 लाख रुपयांवरून 7 लाख रुपये करण्यात आली, शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायासाठी कर्जाचे लक्ष्य 20 लाख कोटी रुपयांपर्यंत, स्वस्त वाहतूक सेवा देण्यासाठी कोस्टल शिपिंगला प्रोत्साहन, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची मर्यादा 15 लाखांवरून 30 लाख रुपये, तर पर्यटन क्षेत्रात तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार/नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. अशा काही महत्त्वाच्या घोषणा यावेळी करण्यात आल्या.
 
यावरुन ठाणे आ.संजय केळकर, आ. निरंजन डावखरे, सुजाता सोपारकर,अध्यक्षा टिसा, संदीप पारीख, अध्यक्ष (कोसीआ) यांनी सादर झालेला 'अर्थसंकल्प २०२३' यावर प्रतिक्रिया दिल्या.
 
सर्व घटकाना न्याय देणारा अर्थसंकल्प
 
पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण करणारा व रिकाम्या हाताने काम देणारा अर्थसंकल्प केंद्रीय वित्तमंत्र्यांनी जाहीर केला अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होणार असून रोजगार निर्मिती प्रचंड प्रमाणात होणार आहे. हा अर्थसंकल्प सर्व घटकांना न्याय देणारा तर आहेच, पण सामान्यांनाही दिलासा देणारा आहे. विद्यार्थी तसेच, महिला सक्षमीकरण व ज्येष्ठ नागरिकांना पाठबळ देणारा हा अर्थसंकल्प आहे. सूक्ष्म व लघु उद्योगानाअनेक सवलती दिल्याने खऱ्या अर्थाने देशाच्या उद्योग क्षेत्राला चालना मिळणार आहे. परिपूर्ण व सर्वांगीण विकास करणाऱ्या या अर्थसंकल्पामुळे सर्व भारतीयांना दिलासा मिळणार आहे. म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष अभिनंदन !
- आ.संजय केळकर
 
`मोदी है तो मुमकिन है'
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने `सबका साथ सबका विकास' या घोषणेनुसार अर्थसंकल्पातून समाजातील प्रत्येक घटकाला दिलासा दिला आहे. भारताला वेगवान प्रगतीकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे. सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर माफ करण्यात आला. पोस्टातील मासिक उत्पन्नाच्या ठेवीची मर्यादाही साडेचार लाखांहून ९ लाख रुपयांवर नेण्यात आली आहे. गेल्या आठ वर्षांत केलेल्या विकासामुळे भारतीयांचे वार्षिक सरासरी उत्पन्नही १ लाख ९७ हजार रुपयांपर्यंत वाढले आहे. तेव्हा,`मोदी है तो मुमकिन है'!
- आ. निरंजन डावखरे
 
उत्पादन व पायाभूत सुविधांचे विकासाभिमुख बजेट
 
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यासोबतच लघुउद्योजकांना सक्षम करण्यास मदत केली आहे. अतिरिक्त हमी न देता क्रेडिट मिळणार असल्याने लघुउद्योजकांना सक्षम होण्यास मदत होईल. तसेच, शुल्कात १ टक्क्यांनी कपात केल्याने लघुउद्योजकांच्या खर्चात बचत होईल. रेल्वेसाठी भरघोस तरतुद केल्यामुळे रेल्वेच्या नव्या योजना तसेच स्वतंत्र कॉरिडॉरचे काम जलदगतीने होतील. त्यामुळे मालाची वाहतूक विनाअडथळा जलद होईल.ग्रामीण भागातील तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी स्टार्टअपला कृषी एक्सीलरेटर फंड स्थापन करण्यात येणार असल्याने चालना मिळेल.
- सुजाता सोपारकर,अध्यक्षा टिसा
 
लघुउद्योजकांच्या वेळेची बचत
 
डिजीलॉकर ही आता सर्वांसाठी वन-स्टॉप केवायसी देखभाल प्रणाली जाहीर केल्याने, ज्यात आपण गरजेनुसार कागदपत्रांमध्ये बदल करता येईल जी डिजिलॉकरशी लिंक असलेल्या तुमच्या सर्व दस्तऐवजांमध्ये दिसून येईल. या जाहीर घोषणेमुळे विशेषतः लघुउद्योगांचा अमूल्यवेळ वाचणार आहे.
- संदीप पारीख, अध्यक्ष (कोसीआ)
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.