'डिजिटल व्हॅन' बनली आता मोदींची गॅरंटीवाली गाडी; पंतप्रधान मोदींनीच केली पुष्टी

    09-Dec-2023
Total Views |
PM Narendra Modi on Digital Van

ठाणे :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून “विकसित भारत संकल्प यात्रे” चे आयोजन संपूर्ण भारतभर करण्यात आले आहे. यासाठी डिजिटल स्क्रिन असलेल्या व्हॅन द्वारे विविध ठिकाणी पोहचुन लाभार्थ्याना प्रत्यक्ष योजनांचा लाभ देण्यात येत आहे. याच व्हॅनचा उल्लेख करीत शनिवारी दुरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधताना स्वतः पंतप्रधानांनी ही "मोदींची गॅरंटीवाली गाडी' असा उल्लेख केला. त्यामुळे संकल्प यात्रेची ही व्हॅन "मोदींची गॅरंटीवाली गाडी' बनली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्यातील विधानसभा निवडणुकीत "मोदींची गॅरंटी' या घोषणेचा प्रत्यय आला. या तिन्ही राज्यात काँग्रेसचे पानीपत करीत भाजपने विजय संपादन केल्याने मोदींची गॅरंटी ही घोषणा प्रत्येक भारतीयाच्या मनात कोरली गेली आहे. दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून “विकसित भारत संकल्प यात्रा' ठाण्यात नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून डिजिटल व्हॅन द्वारे प्रत्येक गरजू लाभार्थ्याचा शोध घेणे, त्याला योजनांची माहिती देणे, त्याला प्रत्यक्ष लाभ तात्काळ देणे, अशा प्रकारचे काम सुरू आहे.

लोकांच्या अपेक्षापूर्तीसाठी शासन आणि शासकीय यंत्रणा अहोरात्र प्रयत्नशील असुन पंतप्रधान स्वतः अनेक ठिकाणी लाभार्थ्याशी दुरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधत आहेत. ठाण्यातही अशाच संकल्प यात्रेत बोलताना पंतप्रधानांनी संपूर्ण भारतातील नागरिक ‘विकसित भारत संकल्प यात्रे’शी जोडले गेले आहेत. तेव्हा, ही डिजिटली व्हॅन म्हणजे "मोदींची गॅरंटीवाली गाडी' असा उल्लेख करून पंतप्रधान मोदींनी उपस्थितांची मने जिंकली.

मोदींशी संवादाने काल्हेरवासी झाले प्रेरित

पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या देशभरातील लाभार्थ्यांशी दूरदृष्य प्रणालीव्दारे थेट संवाद साधत असुन लाभार्थ्यांचे प्रत्यक्ष अनुभव जाणून घेत आहेत. ‘विकसित भारत’ हा संकल्प सत्यात आणण्यासाठी प्रत्येक भारतीय मनापासून प्रयत्न करताना दिसत आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ वंचितांपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. काल्हेर ग्रामस्थ मोदींच्या या संवादामुळे प्रेरित झाल्याचे चित्र दिसून आले.