भारतीय संस्कृती आणि संस्कारांचे बाळकडू देणारे बोर्डगेम्स

09 Dec 2023 22:12:00
Interview With Chanchal Malviya

खेळांतून भारतीय संस्कृतीची ओळख मुलांना करून देण्यासाठी, प्रयत्नशील असलेले चंचल मालवीय यांनी अनेक ’बोर्डगेम्स’ तयार केले आहेत. खेळता-खेळता मुलांवर संस्कार व्हावेत, आपल्या परंपरा, आपल्या कथा यांची माहिती त्यांना बालवयातूनच व्हावी, यासाठी मालवीय गेली काही वर्षे रामायण, गीता यांसारखे विषय घेऊन मुलांसाठी रंजक खेळ तयार करतात. या खेळांना मुलांकडून आणि पालकांकडून उत्तम प्रतिसाददेखील मिळताना दिसतो. तेव्हा आगामी राममंदिर लोकापर्णाच्या पार्श्वभूमीवर या खेळांविषयी, त्यामागील संकल्पनेविषयी चंचल मालवीय यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने साधलेला हा विशेष संवाद...

आपल्याकडे ’बोर्डगेम्स’ ही संकल्पना तशी नवी नाही. महाभारत काळातील द्यूत आपल्या सर्वांना परिचित आहेच. ज्ञानेश्वरांनी काढलेला मोक्षपट आपल्या परिचयाचा. परंतु, लहान मुलांसाठी अशाप्रकारे भारतीय संस्कृतीमधील कथारुपी खेळ तयार करण्याची देण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली?

सुरुवात आम्ही ’बोर्डगेम्स’पासून नाही, तर मोबाईलपासून केली. आमचे दोन वेगवेगळे उपक्रम आहेत. सांस्कृतिक शाखा आणि शैक्षणिक शाखा. त्यात आम्ही अशाप्रकारचे विविध खेळ डिझाईन करत असतो. मुलांना फक्त खेळायचं असतं. त्या खेळांमध्ये ती रमतात, गुंतून जातात. हे असं वय असतं की, या वयात आपण मुलांना जे-जे सांगू, जे दाखवू त्यातून त्यांच्यावर संस्कार घडत असतात. इतर धर्मातील कथा सांगण्यापेक्षा आपल्या संस्कृतीतील पारंपरिक कथा त्यांना सांगायला हव्यात, असे कुठेतरी मला वाटले. त्यातून हे खेळ तयार करण्याची प्रेरणा मिळाली. आमचा पहिला खेळ तयार झाल्यानंतर मुलांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला, तेव्हा या इच्छेला बळ मिळाले.

सध्या कोणकोणते खेळ तुम्ही तयार केले आहेत? तसेच आजच्या काळात मुलांचा मोबाईल वापरदेखील खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतो. तेव्हा त्या माध्यमातून हे खेळ आणण्याचा तुमचा विचार आहे का?

आज मी उदाहरण दाखवण्यासाठी म्हणून सात वर्षांखालील मुलांचा एक खेळ ’शिशु विवेक’ आणि सात वर्षांवरील वयोगटातील मुलांचा ’प्रिन्स ऑफ अयोध्या’ हा खेळ आणला आहे. त्याबरोबरच गीतेवर आधारित एक खेळ तयार होत आहे, त्याचे काम अजूनही सुरू आहे. आता तुम्ही म्हणाल, हा खेळ स्थानिक भाषेत न दाखवता इंग्रजीत का आणला, तर स्थानिक भाषांमधूनसुद्धा आम्हाला हे बोर्डगेम्स आणायचे आहेत; पण तत्पूर्वी एक मोठे व्यासपीठ प्रायोगिक तत्त्वावर मिळावे म्हणून इंग्रजी भाषा आम्ही निवडली. आज मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात. त्यांच्या भाषेसोबतच त्यांना त्यांची संस्कृती साहजिकच जवळची वाटते. मग आपली संस्कृती त्यांना समजावून देण्यासाठी त्यांचे माध्यम वापरले. मोबाईलच्या माध्यमातून खेळ आणायचे म्हटल्यास, आज काही वेगळी परिस्थिती नाही. आई-बाबांना एकटं मूल असतं. त्याला शांत करण्यासाठी त्याच्या हातात ते मोबाईल नावाचं खुळखुळं देतात खरे. पण, परस्पर संबंध आणि अशा अनेक गोष्टी त्याने कुठून शिकाव्या? हे खेळ खेळताना ते बाजूच्या चार मुलांना सोबत घेतात आणि एक तीळ सात जणांत कसा वाटून घ्यावा, याची शिकवण त्याची त्याला मिळत जाते. आम्हाला सुसंवाद सुरू करायचा आहे, विसंवाद नाही.

मुलांप्रमाणेच अलीकडे महिलांच्या मोबाईल वापरातदेखील वाढ झालेली दिसते. तेव्हा मग विशेषत्वाने महिलांसाठी असा एखादा खेळ तयार करण्याचा तुमचा विचार आहे का?

हो, नक्कीच आहे. महिलांसाठी आपण एका प्रकल्पावर काम करतोय. ‘मदर ऑफ गोडेस’ असा हा एक खेळ आहे. यात पुढे खेळण्यासाठी काही माहिती पत्रके दिली आहेत. ती वाचून खेळ पुढे सरकत जातो. स्त्रियांबद्दल मला नेहमीच आदर वाटतो. तो यासाठी की, स्त्रिया सर्वशक्तिमान आहेत. शक्तीचं रूप आहे ती. केवळ तिला तिच्या शक्तीची जाणीव नाही. ती आपण करून द्यायला हवी. नाही तर काय होतं की, त्यांची शक्ती इतर गरज नसलेल्या ठिकाणी वाया जाते. एकाचवेळी अनेक कामे करण्याची संसारी स्त्रियांना सवय असतेच. असेच काहीसे आणि बरेच काही नवीन या खेळातून त्यांना शिकायला मिळेल, याबद्दल मला विश्वास आहे. शेवटी स्त्री ही संपूर्ण एक कुटुंब चालवत असते.

तुम्ही तयार केलेल्या या खेळांचे साधारण स्वरूप कसे आहे? तसेच या खेळांसाठी नियम आणि अटी ठरवताना प्रकर्षाने कोणत्या पद्धतीने विचार केला जातो? आणि अर्थात, हे खेळ हवे असतील तर ते कुठे उपलब्ध होतील?

इतर ’बोर्डगेम्स’ किंवा आपलेच पारंपरिक खेळ जसे की ल्युडो, सापशिडी, नवा व्यापार आणि आपले द्यूत किंवा मोक्षपट. त्यापैकी ज्ञानेश्वरांनी आणलेला मोक्षपट असा एकच आहे, ज्यातून काही शिकवण दिली जाते. पण, अर्थात तो केवळ मोठ्यांसाठी आहे, तसेच त्याचा लहान मुलांना फार फायदा नाही. मला असे वाटते की, हे खेळ लहान मुलांसाठी उपलब्ध असायला हवेत. त्यांच्या वयात जेव्हा हे संस्कार त्यांच्यावर होतील, तेव्हा तेच आपल्या परंपरा पुढे सुरू ठेवतील. मी आज दाखवायला दोन खेळ आणलेत. त्यापैकी पहिला आहे-सात वर्षांखालील मुलांचा ’शिशु विवेक.’ हा सापशिडी सारखाच आहे. यात १०० घरे आहेत; परंतु मोक्ष मात्र ९५व्या घरावर आहे. तुमच्याकडून ते घर सुटलं, तर पुन्हा जीवनसायकल सुरू होते. मोक्ष सुटता कामा नये आणि यात साप आणि शिड्या देण्याऐवजी आम्ही पुन्हा लहान माहिती पत्रके वापरली आहेत. साप वाईट आणि पटकन मिळणारी शिडी चांगली हे मुलांना समजले, तर ती मेहनत करणे सोडून देतील. याच खेळातून त्यांना संस्कृत श्लोक पाठ करवून घेतले जातात.

दुसरा खेळ आहे, तो ’प्रिन्स ऑफ अयोध्या.’ रामाच्या जीवनातील पाच भागांवर आधारित हा खेळ आहे. हे खेळ सध्यातरी आमच्या संकेतस्थळावरून वितरित होतात. परंतु, लवकरच त्यांना ’अ‍ॅमेझॉन’ किंवा अशा मोठ्या माध्यमवरून आणण्याचा आमचा विचार आहे.

(वरील बोर्डगेम्स खरेदी करण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी संपर्क- ७९७२५०९७३४
यासंबंधी माहिती घेण्यासाठी खालील संकेतस्थळालादेखील आपण भेट देऊ शकता.)
https://www.metaschooling.in/meta-store
Powered By Sangraha 9.0