व्हेनेझुएला आणि गयानाचा वाद

08 Dec 2023 20:57:45
Venezuela moves to claim Guyana-controlled region

इस्सेक्युईबा प्रदेशाला आपल्या देशात सामील करायचे का? असे सर्वेक्षण देशात केले गेले. त्यामध्ये जनतेने कौल दिला की, इस्सेक्युईबाला आमच्या देशाचे राज्य बनवणार. या प्रदेशाला वेगळे राज्य बनवून, तिथल्या लोकांना आमच्या देशाचे नागरिकत्वही देणार, अशी घोषणा व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी केली. इतकेच नाही तर इस्सेक्युईबामध्ये असलेल्या नैसर्गिक संपत्तीसंदर्भात व्यवसाय करण्याचे आदेशही निकोलस यांनी संबंधितांना दिले आहेत. इस्सेक्युईबा हा प्रदेश खनिज संपत्तीने श्रीमंत. सध्या गयाना देशाच्या हद्दीत आहे. गयाना आणि व्हेनेझुएलाचे इस्सेक्युईबावरून गेले दीडशे वर्षं वाद सुरू आहेत. दोन्ही देश या प्रदेशावर आपला हक्क सांगतात. आंतरराष्ट्रीय निर्णयावरून सध्या तरी हा प्रदेश गयाना देशाच्या नकाशात आहे.
 
या सगळ्या घडामोडींसाठी व्हेनेझुएला आणि गयानाचा आर्थिक इतिहास तपासणे गरजेचे. व्हेनेझुएला हा काही वर्षांपूर्वी तेल, खनिज या नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे अत्यंत श्रीमंत देश होता. जगभरातल्या कच्च्या तेलाच्या साठ्यांपैकी १८.२ टक्के साठा या देशात होता. एक लीटर पेट्रोलसाठी तिथे केवळ ०.०२ डॉलर म्हणजे १.६५ पैसे मोजायला लागायचे. इथे हयुगो शावेज हे सत्तेत आले आणि त्यानंतर तर व्हेनेझुएलामध्ये साम्यवादी शासन लागू झाले. शावेजचे म्हणणे होते की, ’देशामध्ये सर्वच सुविधा मोफत द्यायच्या.‘ त्यामुळे अतिश्रीमंत देशाच्या अतिश्रीमंत नागरिकांना पाणी, वीज आणि वाहतुकीसह अनेक सुविधा सरकारतर्फे मोफत करण्यात आल्या. त्यातच व्हेनेझुएलामध्ये चीनने रस दाखवायला सुरुवात केली. भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी चीनने या देशाला भरमसाठ कर्ज दिले. चीन ज्या देशाला कर्ज देतो, तो देश रसातळाला जातो, हा इतिहास. दुसरे असे की, चीन आणि रशिया या दोघांच्या साथीने व्हेनेझुएलाने अमेरिकेशी कायमच शत्रुत्व पत्करले.

देशात काहीही झाले की, व्हेनेझुएलाचे सरकार अमेरिकेला दोषी ठरवू लगाले. याची हद्द म्हणजे ह्युगो शावेज यांना कर्करोग झाला, तेव्हा त्यांनी म्हटले की, अमेरिकेच्या विरोधात आहे, म्हणून अमेरिकेने मला कर्करोग व्हावा म्हणून षड्यंत्र रचले. पुढे निकोलस मादुरो राष्ट्रपती झाले. त्यांनीही देशात सगळ काही विनामूल्य ही पद्धत कायमच ठेवली. पण, त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी होत गेली. दहा लाखांची नोट छापणार्‍या व्हेनेझुएला या श्रीमंत देशामध्ये प्रचंड आर्थिक अस्थिरता आली. महागाई इतकी वाढली की, एक कप कॉफीची किंमत २५ लाख रूपये झाली. काही महिन्यांपूर्वी या देशाचा महागाई दर ४२९ टक्के होता. अगदी थोड्या कालावधीत व्हेनेझुएलाचे लोक श्रीमंतीकडून अतिगरिबीच्या वर्तुळात फेकले गेले. व्हेनेझुएलाचे नागरिक या सगळ्या परिस्थितीला वैतागले. व्हेनेझुएलाचे नागरिक एकत्रित येत, देशाचे सरकार उलथून टाकतील, याची खात्री निकोलस मादुरो यांना आहे. अमेरिका त्यासाठी प्रयत्न करेल, अशी भीतीही मादुरो यांना सतावते.
 
अशातच शेजारचे पारंपरिक शत्रूराष्ट्र गयानाची परिस्थिती झपाट्याने बदलू लागली. २०१५ पूर्वी गयाना हा अत्यंत गरीब देश होता. याच काळात ’एक्सन मोबिल कॉपोर्रेशन’ने गयाना देशात खनिज तेल शोधून काढले. या खनिज संपत्तीमुळे गयानाच्या आर्थिकतेत ऐतिहासिक वृद्धी आली. मागच्या पाच वर्षांपासून गयानाच्या आर्थिक वृद्धीचा दर २७.१४ इतका वाढला. २०२३ साली तर हा दर ६२.३ टक्क्यांनी वाढला. गरीब असलेला गयाना श्रीमंतीकडे वाटचाल करू लागला. कालपर्यंत गरीब असलेला गयाना अचानक श्रीमंत होत आहे आणि कधीकाळी अतिश्रीमंत असलेला आपला व्हेनेझुएला देश गरीब झाला, हे शल्य व्हेनेझुएलाच्या नागरिकांच्या मनात आहेच. नेमके या शल्याला लक्ष्य करत, व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींनी गयानाच्या खनिज संपत्ती समृद्ध प्रदेशालाच गयानाकडून काढून घेण्यासंदर्भात देशात सर्वेक्षण केले. गरिबीने गांजलेल्या व्हेनेझुएलाच्या नागरिकांनी राष्ट्रपती मादुरोंना त्यासाठी समर्थन दिले. मात्र, गयाना देशाने याविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर तक्रार केली. एखाद्या देशाचा भूभाग दुसरा देश कसा काय ताब्यात घेऊ शकतो, असा प्रश्न विचारला आहे.

वरवर जरी हे युद्ध व्हेनेझुएला आणि गयानाचे दिसत असले तरी ते तसे नाही. कारण, अमेरिकेने गयानाला समर्थन केले आहे. दुसरीकडे व्हेनेझुएला देशाला कायमच रशिया आणि चीनचे समर्थन मिळाले. अमेरिका आणि रशिया या दोघांचेही प्रयत्न असतील की, आपल्या समर्थक देशाकडे ही खनिज संपत्ती असावी. त्यामुळे व्हेनेझुएला आणि गयानाचा वाद हा जागतिक पटलावर महत्त्वाचा म्हणावा लागेल.

९५९४९६९६३८
Powered By Sangraha 9.0