माहिती तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरासाठी महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

08 Dec 2023 19:20:03
Mahavitaran Won National Award for IT

मुंबई :
वीज ग्राहकांना सेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट वापर केल्याबद्दल आणि माहितीचे विश्लेषण करून धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत मदत केल्याबद्दल महावितरणला द गव्हर्नन्स नाऊ या संस्थेतर्फे दोन प्रवर्गात राष्ट्रीय पुरस्कार दि. ०७ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आले. या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कंपनीच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे अभिनंदन केले.
 
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या कामात आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून ग्राहकांना सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणने विविध पावले उचलली आहेत. तसेच वीज ग्राहकांकडून होणारा विजेचा वापर, त्यांच्याकडून मिळणारी बिले, वीज पुरवठ्यातील समस्या अशा विविध बाबतीत निर्माण होणारी माहिती गोळा करून त्याचे विश्लेषण करणे आणि निर्णय प्रक्रियेत मदत करणे असेही काम माहिती तंत्रज्ञान विभागाकडून केले जाते. या दोन्ही कामांबद्दल विभागाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे.

महावितरणने वीज ग्राहकांना नवीन वीज कनेक्शन घेणे, वीज पुरवठ्याविषयी तक्रार करणे, वीज बिल भरणे अशा विविध कामांसाठी वेबसाईटवर आणि ॲपवर सुविधा उपलब्ध केली आहे. त्यांना घरबसल्या या सेवा मिळविता येतात. महावितरणचा ट्रान्सफॉर्मर जळाला किंवा नादुरुस्त होऊन वीज पुरवठा खंडित झाला तर त्याचीही तक्रार ॲपवरून करता येते. ईज ऑफ लिव्हिंगसाठी महावितरणने उपलब्ध केलेल्या ऑनलाईन सेवांचा ग्राहकांनी वापर करावा, असे आवाहन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले.

महावितरणचे सिस्टीम ॲनालिस्ट दिनेश लडकत आणि प्रोग्रॅमर हसीब खान यांनी पुरस्कार स्वीकारला. गव्हनर्न्स नाऊ हे सार्वजनिक धोरण आणि सुशासन यासंदर्भातील प्रतिष्ठित प्रकाशन आहे. त्यांनी सार्वजनिक उपक्रमांतील माहिती तंत्रज्ञानाच्या वापराविषयी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. हे पुरस्कारांचे आठवे वर्ष आहे. देशभरातील विविध सार्वजनिक कंपन्यांच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीचे मूल्यमापन करून हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
 
Powered By Sangraha 9.0