शाळांच्या वेळा बदलण्यात आगळीच समस्या!

08 Dec 2023 16:17:45
Governor of Maharashtra Said Primary School Timing Change

मुंबई, दि. ६ (रोहित कदम) : झपाट्याने बदलत्या जीवनशैलीमुळे विद्यार्थ्यांना पुरेशी झोप मिळेनाशी होत आहे. याचा विचार करून शाळांच्या वेळांमध्ये बदल करायला हवा, असे मत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथील ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान कार्यक्रमातील भाषणात मांडले. यानिमित्त इतक्या वर्षांत पहिल्यांदाच शाळांच्या वेळांचा मुद्दा चर्चेत आला आहे. यानिमित्त दै.'मुंबई तरुण भारत'ने शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांशी साधत या समस्येला वाचा फोडली.

शहरी भागात बऱ्याच खासगी किंवा अनुदानित तत्वावर सुरू असलेल्या शाळांसाठी प्रार्थमिक आणि माध्यमिक विभागासाठी एकच खोली उपलब्ध आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी जागेची वानवा हा बऱ्याच वर्षांपासून रखडलेला विषय आहे. त्यात वेळांतील बदल करायचा झाल्यास या दोन्ही सत्रांतील शाळांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता काही शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पहिली ते चौथीतील किमान दोन तुकड्यांना आठ वर्ग आणि त्यानंतर सहावी ते दहावीसाठी १२ खोल्यांची गरज आहे. सर्वांच्या वेळापत्रकातील बदल केल्यास जागेची अडचण नाकारता येत नाही. काही खासगी शाळांमध्ये एका इयत्तेला स्वतंत्र खोली असली तरीही पालकांच्या कार्यालयीन वेळेत हा बदल झाला तरीही अडचण होण्याची शक्यता आहे.

राज्यपाल बैस यांच्या मते, "बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वांच्या झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत मुले जागीच असतात. परंतु, शाळेत जाण्याकरिता मुलांना सकाळी लवकर उठावे लागते. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नसल्याने त्यांना चांगली झोप मिळण्याच्या दृष्टिकोनातून विचार होणे गरजेचे आहे. यामुळे शाळांच्या वेळा बदलण्याबाबत विचार करायला हवा.", अनेक पालकांनी या वक्तव्याला पाठिंबाही दर्शविला आहे. इंटरनेट आणि मोबाईलचा अतिवापर हे प्रमुख कारण मानले जात आहे. काही ठिकाणी दोन्ही पालक नोकरदार असल्याने त्यांच्याही घरी परतण्याच्या वेळा उशीराच्या असतात. त्यांनाही सकाळच्या वेळेस पुन्हा विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्याची असलेली गडबड टाळता येईल, असेही मत काही पालकांचे आहे.

"राज्यपालांनी सांगितलेल्या समस्येत वास्तव आहे. पालकांनीही आपला दिनक्रम रात्री १० पर्यंत संपविला पाहिजे. काही पालक रात्री उशीरापर्यंत टिव्ही मालिका पहात असतील तर मुलांनाही रात्री उशीरा जागण्याची सवय लागेल. सुर्योदयानंतर दिनक्रम सुरू व्हायला हवा. शाळा उशीरा सुरू झाल्यास संपूर्ण वेळापत्रक कोलमडेल. शिक्षकांनाही त्यांचे वेळापत्रक पूर्ण करता येणार नाही. मोबाईलचा अतिवापर टाळून मूलांना चांगली झोप मिळावी यासाठी पालकांनीही प्रयत्नशील असायला हवे, असे आवाहन त्यांनी केले आहे. - गणेश बटा, संचालक बॅरिस्टर नाथ पै शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई


Governor of Maharashtra Said Primary School Timing Change

"मुलांची झोप पूर्ण होण्याचा आणि शाळेची वेळ याचा काहीही संबंध नाही. 'लवकर निजे, लवकर उठे त्यासी आरोग्य लाभे' या उक्तीनुसार जर घरातली माणसे आणि मुले जर लवकर झोपली आणि लवकर उठले तर सर्वांचीच झोप व्यवस्थित पूर्ण होईल. आम्ही विद्यार्थी दशेत असताना पहाटे लवकर उठून अभ्यास करायचो. आत्ताची जीवनशैली बदलून पूर्वीची जीवनशैली आत्मसात केली तर मुलांचे शारिरीक आणि मानसिक आरोग्य चांगले राहिल. मोबाईलमुळे मुलांसह पालकांच्याही आरोग्यावर परिणाम जाणवू लागला आहे. विद्यार्थ्यांना लवकर उठवून योगासने किंवा अन्य व्यायाम करण्याची सवय लावल्याने हा आळस दूर होऊ शकतो." - भारती रुळे, मुख्याध्यापिका, चार्टर्ड इंग्लिश सेकंडरी स्कूल, ऐरोली

Governor of Maharashtra Said Primary School Timing Change

"राज्यपालांचे विधान वास्तवाला धरूनच आहे. कितीही प्रयत्न केला तरीही दिनक्रम संपवायला मुंबईसारख्या ठिकाणी उशीरच होतो. विद्यार्थी सकाळच्या वेळेत पेंगत असल्याच्या तक्रारी असतात. त्यामुळे शाळा थोडावेळ का होईना उशीराने सुरू केल्यास कुणाचीही हरकत नसावी. याचा मुलांनाही फायदाच होईल." : बाळासाहेब मोटे, संस्थापक मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घेरडी
 
Governor of Maharashtra Said Primary School Timing Change  
Powered By Sangraha 9.0