ड्रग्ज तस्करांशी हातमिळवणी केल्यास पोलिसांना थेट बडतर्फ करणार - फडणवीस

08 Dec 2023 22:00:22
Devendra Fadnavis on Drug trafficking

नागपूर
: ड्रग्ज तस्करांशी हातमिळवणी केल्यास पोलिसांना थेट बडतर्फ केले जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, ८ डिसेंबर रोजी विधानपरिषद सभागृहात केली.

राज्यात ड्रग्जविरोधात पोलीस दलाची लढाई सुरू आहे. मात्र, ड्रग्जविक्री करणार्‍या आरोपींसमवेत कुणी हातमिळवणी केली अथवा त्यांचे संगनमत असेल, तर कलम ३११ अंतर्गत संबंधित पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना थेट सेवेतूनच बडतर्फ करण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले. आमदार अनिकेत तटकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.
 
केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राज्यांतील गृहमंत्र्यांची बैठक घेतली होती. यात ड्रग्ज तस्करीचे नेटवर्क मोडून काढण्याविषयी सखोल चर्चा झाली. तसे निर्देश राज्यातील सर्व अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. काही प्रकरणांमध्ये बंद कारखान्यांमध्ये अंमली पदार्थ तयार केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच छत्रपती संभाजीनगर, रायगड, नाशिक, पुणे या भागांतील बंद कारखान्यांत हालचाल आढळल्यास तेथे धाड टाकण्याची कारवाई चालू आहे.

राज्यात पोलीस विभागाच्या वतीने ड्रग्जच्या विरोधात लढाई चालू असून, ती बराच काळ चालेल. अनेकदा बाहेरील राज्यातील पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. त्यांना मिळालेल्या ‘इंटेलिजन्स’च्या आधारावर ती कारवाई होते; मात्र बहुतांश प्रकरणात त्याची स्थानिक पोलिसांना पूर्वकल्पना देण्यात येते, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0