नवी दिल्ली : कॅश फॉर क्वेरी प्रकरणात टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महुआ मोईत्रा यांची लोकसभेतून निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा केली. यावेळी लोकसभा अध्यक्ष म्हणाले, "महुआ मोइत्रा यांचे वर्तन अनैतिक आणि अशोभनीय असल्याचा समितीचा निष्कर्ष हे सभागृह मान्य करते. त्यामुळे त्यांनी खासदार म्हणून कायम राहणे योग्य नाही."
टीएमसी नेत्या महुआ मोइत्रा यांना संसदेच्या या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. महुआ मोइत्रा यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहातून सभात्याग केला. त्याचवेळी लोकसभेचे कामकाज ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर संसदेत अदानी समूहाच्या विरोधात प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यासोबतच त्यांनी संसद पोर्टलचा पासवर्ड उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्यासोबत शेयर केल्याचा आरोप त्यांच्यवर करण्यात आला होता. त्यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप फेटाळला होता. पण त्यासोबतच त्यांनी दर्शन हिरानंदानी यांच्यासोबत संसद पोर्टलचा पासवर्ड शेयर केल्याचा आरोप स्विकारला होता. त्यामुळे आचारसंहिता समितीच्या शिफारशीवरुन संसदेतून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.