प्रसाद खांडेकरांचा मुद्दा अधिवेशनात गाजला! फडणवीस म्हणाले, "तो अतिशय गुणी कलावंत पण..."

07 Dec 2023 14:44:05

Prasad Khandekar & Fadanvis


नागपूर :
विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी अभिनेते प्रसाद खांडेकर यांचा मुद्दा चांगलाच गाजला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसाद खांडेकर हा अतिशय गुणी कलावंत आहे. त्याच्या सिनेमाला चित्रपटगृह मिळत नसेल तर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.
 
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रसाद खांडेकर या मराठी तरुणाच्या चित्रपटाला चित्रपटगृह मिळत नाही असा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. ते म्हणाले की, "येत्या ८ डिसेंबर रोजी प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा' हा मराठी चित्रपट येत आहे. पण काही सिनेमातील दादा लोक मराठी सिनेमाला चित्रपटगृह मिळू देत नाही. प्रसाद खांडेकर हा सर्वसामान्य कुटुंबातील मराठी तरूण आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपटाला तात्काळ सिनेमागृह उपलब्ध करून द्यावा," अशी मागणी त्यांनी केली.
 
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "प्रसाद खांडेकर हा अतिशय गुणी कलावंत आहे. हास्यजत्रेच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने लोकांच्या मनावर पगडा निर्माण केला आहे. त्यामुळे जर अशा मराठी सिनेमाला चित्रपटगृह मिळत नसेल तर आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करून ते उपलब्ध करुन दिले जाईल," असे आश्वासन त्यांनी दिले.



Powered By Sangraha 9.0