आमदार अपात्र ठरले, तरी त्यांना निवडणूक लढविण्यास बंदी नाही!
07 Dec 2023 13:30:33
नागपूर : शिवसेना आमदार अपात्रता यांचिकांवर मॅरेथॉन सुनावणी सुरू असताना, यातील अपात्र ठरणाऱ्या आमदारांना पुढील कोणतीही निवडणूक लढविण्यास बंदी राहणार नाही, असे सूतोवाच विधिमंडळातील एका उच्चपदस्थ व्यक्तीने पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना नागपूर येथे केले.
येत्या काही दिवसांत शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीच्या आमदारांचीही सुनावणी सुरू होणार आहे. अशावेळी आमदार अपात्र ठरले, तरी त्यांना पुढील कोणतीही निवडणूक लढण्यास मज्जाव नसेल. विशेष म्हणजे अपात्र ठरलेला कोणताही आमदार विधानपरिषदेची निवडणूक लढवून तात्काळ सभागृहाचा सदस्य होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. परिणामी, राजकीय भविष्य टांगणीला लागलेल्या आमदारांना या दाव्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
सर्वोच्च न्यालयाने ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याची सूचना केली असली, तरी केवळ संविधानिक संस्था म्हणून त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. अध्यक्षांच्या निर्णयात अन्य कुठलीही संस्था हस्तक्षेप करू शकत नाहीत, असेही हा उच्चपदस्थ व्यक्ती म्हणाला. सुनावणीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षांनी आपल्या कामकाजाची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ अशी निश्चित केली आहे. त्यानुसार विधानसभेचे कामकाज सांभाळून दुपारी ३ ते ७ किंवाा सायंकाळी ६ ते ९, अशा वेळेमध्ये सुनावणी घेण्याचे नियोजन आहे.
आता सुनावणी मुंबईत नाही!
शिवसेनेच्या अपात्रता याचिकांवर शनिवारसह रविवारीही सुनावणी घेण्याचे विचाराधीन आहे. प्राप्त परिस्थितीत विधिमंडळाचे सर्व कामकाज नागपुरात सुरू असल्याने हा सारा गोतावळा मुंबईत हलविणे शक्य नाही. त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर २५ डिसेंबरपर्यंत नागपुरात सुनावणी घेण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. त्याव्यतिरिक्त ३१ जानेवारीपर्यंत राष्ट्रवादीच्या याचिकांवरही निर्णय घ्यायचा असल्याने, वेळेचा अंदाज घेऊन सुनावणीला सुरुवात केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.