मुंबई : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांच्याविरोधात महाराष्ट्र भाजपच्या वतीने दि. ८ डिसेंबर रोजी राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान आम्ही सहन करणार नाही. भाजपचे सर्व कार्यकर्ते उद्या राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील. वीर सावरकरांची प्रतिमा विधानसभेतून काढण्याच्या वक्तव्यावरून आता भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
प्रियांक खर्गे म्हणाले की, आपण विधानसभेचा अध्यक्ष असतो तर बेळगाव येथील सुवर्णसौध विधानसभेतून वीर सावरकरांचा फोटो काढून टाकला असता. एवढेच नव्हे तर पुढे ते म्हणाले की, सावरकरांचे योगदान काय? सावरकरांना वीर ही पदवी कशी मिळाली हे भाजपने सांगावे? सावरकरांना वीर ही पदवी कोणी दिली? असे प्रश्न त्यांनी भाजपला विचारले. त्यानंतर राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. कर्नाटकचे माहिती व प्रसारण मंत्री प्रियांक खर्गे यांनी वीर सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे.