मराठा आरक्षणात पुर्नविचार याचिका! प्रश्न निकाली लागणार का? काय घडणार?

06 Dec 2023 14:24:11

Maratha Reservation


मुंबई :
ज्या दोन मुद्यांवर मराठा आरक्षण रद्द करण्यात आलं होतं त्या मुद्यांचा पुनर्विचार न्यायमुर्ती करणार असल्याचे मराठा समन्वयक आणि मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले आहे. तसेच यावेळी १०० टक्के मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
 
बुधवारी मराठा आरक्षणाच्या पुर्नविचार याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्याआधी याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधला. ते म्हणाले की, "आजवर सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिकेवर अनेक निर्णय लागले. त्यामुळे जर देशाच्या विरोधात कारवाया करणाऱ्यांना पुर्नविचार याचिकेत न्याय मिळू शकतो तर मराठा समाजाला का मिळू शकत नाही, असे मराठा समाजाचे म्हणणे आहे."
 
"आमच्या दोन जमेच्या बाजू आहेत. पहिली म्हणजे ५० टक्के आरक्षणाची मर्यादा जी सर्वोच्च न्यायालयानेच ईडब्लूएस आरक्षणात संपुष्टात आणली आहे. दुसरी म्हणजे १०२ व्या घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार नाही, असेही न्यायालयाने मागच्या वेळी सांगितले होते."
 
पुढे ते म्हणाले की, "१०५ व्या घटनादुरुस्तीमध्ये संसदेने हा अधिकार राज्याला आहे असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे आम्हाला आज न्याय मिळण्याची दाट शक्यता आहे. यावेळी दोन निर्णय होणे अपेक्षित आहे. एकतर पुर्नविचार याचिका स्वीकारत टक्केवारीवर चर्चा होऊन मराठा आरक्षण मिळू शकतं किंवा त्यांना वाटल्यास यावर परत एकदा सुनावणी होऊ शकते. आज १०० टक्के मराठा समाजाचा विचार होईल. ज्या तरुणांनी बलिदान दिलं त्यांना श्रद्धांजली आणि आम्हाला न्याय मिळेल," अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.



Powered By Sangraha 9.0