नवी दिल्ली : तीन राज्यांमध्ये काँग्रेसच्या झालेल्या दणदणीत पराभवानंतर आज होणारी इंडिया आघाडीची बैठक रद्द करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचा पोपट आता आयसीयूमध्ये असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.भाजपचा पराभव करण्यासाठी मोठा गाजावाजा करून काँग्रेसने इंडिया आघाडीची स्थापना केली होती. या आघाडीमधील २८ पक्ष एकत्र येऊन भाजपचा सामना करणार असल्याचा दावादेखील कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर करण्यात आला होता. त्यानंतर या आघाडीच्या विविध बैठकादेखील आयोजित करून त्यामध्ये लोकसभेसाठीची रणनिती आखण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले होते.
मात्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तीन राज्यांमध्ये काँग्रेसचा झालेला दणदणीत पराभव आणि भाजपचा एकतर्फी विजय यामुळे इंडिया आघाडीतील घटकपक्षांचे अवसान गळाले असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसतर्फे आज इंडिया आघाडीच्या बैठकीचे आयोजन देशाची राजधानी दिल्ली येथे करण्यात आले होते. मात्र, या बैठकीविषयी तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, द्रमुक आणि जदयु हे फारसे उत्सुक नव्हते. त्याचवेळी उबाठा गटातर्फे ही बैठक होणारच असल्याचे दावे केले जात होते. अखेरिस अन्य प्रादेशिक पक्षांनी स्वारस्य न दाखविल्याने ही बैठक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काँग्रेसला पडती भूमिका घ्यावी लागणार
तीन राज्यांमध्ये काँग्रेसचा झालेला पराभव हा आघाडीतील प्रादेशिक पक्षांना बऱ्याचअंशी सुखावणारा असल्याचे दिसत आहे. कारण, हा पराभव काँग्रेसचा असून त्याचा इंडिया आघाडीचा संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. कर्नाटक विजयानंतर काँग्रेसने आघाडीचे ताब्यात घेतलेले नेतृत्वदेखील या पक्षांना रुचलेले नव्हते. त्यामुळे आता आघाडीमध्ये काँग्रेसने पडती भूमिका घेतल्याशिवाय प्रादेशिक पक्ष भाव देणार नसल्याचे दिसत आहे.