"ज्यांनी अडीच वर्षे घरात बसून बोगसगिरी केली, त्यांनी 'शासन आपल्या दारी'वर टीका करणं म्हणजे...

05 Dec 2023 18:27:58

Shinde

बीड :
ज्यांनी अडीच वर्षे घरात बसून बोगसगिरी केली, त्यांनी या कार्यक्रमाला बोगस म्हणणं हा 'शासन आपल्या दारी' मध्ये आलेल्या तमाम लोकांचा अपमान असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. बीड जिल्ह्यातील परळी येथे मंगळवारी आयोजित 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात ते बोलत होते.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आम्ही फक्त बोलत नाही तर करुन दाखवतो आणि केल्यावर बोलतो. पण आज काही लोक पत्रकार परिषद घेऊन म्हणतात की, शासन आपल्या दारी हा सरकारचा बोगस कार्यक्रम आहे. जे अडीच वर्ष घरी बसले त्यांना शासन आपल्या दारीचं महत्त्व काय कळणार? शेतकऱ्यांच्या आणि माता भगिणींच्या वेदना त्यांना काय कळणार? ज्यांनी अडीच वर्षे घरात बसून बोगसगिरी केली, त्यांनी या कार्यक्रमाला बोगस म्हणणं हा 'शासन आपल्या दारी' मध्ये आलेल्या तमाम लोकांचा अपमान आहे," असे ते म्हणाले.
 
उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना पुढे ते म्हणाले की, "शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सर्वसामान्य लोकांसाठी आहे. त्यांना न्याय देण्यासाठी हा कार्यक्रम आहे. मात्र, त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने त्यांना काय करावं ते सुचत नाहीये. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीला दोन तृतीयांश बहुमत मिळालं ही त्यांची पोटदुखी आहे. ही पोटदुखी त्यांच्या छातीत धडकी भरवणारी आहे. परंतू, आम्ही त्यांना कामाने उत्तर देतोय. तुम्ही कितीही आरोप केले तरी तेवढ्याच ताकदीचं काम केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. काल-परवा जे निकाल लागले ते पाहिल्यानंतर मोदीजींचा करिश्मा संपला म्हणणाऱ्यांना जनतेने उत्तर दिले आहे. येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदीच येणार यावर जनतेने शिक्कामोर्तब केलं आहे," असेही ते म्हणाले आहेत.

Powered By Sangraha 9.0