अरुणाचल प्रदेशातील कर्करोग जनजागृती

05 Dec 2023 22:09:40
Article on Arunachal Government Cnacer Initiative

अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात नुकतेच काही संस्थांच्या सहयोगाने ‘देव देश वैद्यकीय शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठान’ने कर्करोगमुक्ती जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या अभियानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सदर जागृती कार्यक्रमाचा तपशील सारांश रूपात देत आहोत.

अरुणाचल सरकार आणि तेथील ‘मन इंडिजिनीअस कल्चरल आणि वेल्फेअर सोसायटी’च्या सहयोगाने नवी मुंबई येथील ‘छबी सहयोग फाऊंडेशन’ तसेच मुंबई येथील ‘देव देश वैद्यकीय शैक्षणिक सामाजिक प्रतिष्ठान’द्वारा दि. १८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान तवांग जिल्ह्यात सहा ठिकाणी कर्करोगमुक्त जागरुकता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

त्यातील पहिल्या शिबिराचे आयोजन भारत-भूतान लगतच्या तुम्बला येथे करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे सभासद युतेन गोंबू यांनी केले. यावेळी ‘मन इंडिजिनीअस कल्चरल आणि वेल्फेअर सोसायटी’चे अध्यक्ष खांडू थूंगन, ‘छबी सहयोग फाऊंडेशन’चे सचिव पार्था रॉय, सल्लागार डॉ. अविनाश गारगोटे, ‘देव देश प्रतिष्ठान’चे अध्यक्ष डॉ. वैभव र. देवगीरकर, डॉ. रवींद्र कांबळे, डॉ. प्रतिका जेटके - कांबळे, डॉ. स्नेहा भट्टे, डॉ. रेणू, सचिन मामगई, जय गणेश मुरुगण, चारू सावंत, मुद्रा देवगीरकर व बाबू कांबळे यांच्या समवेत समन्वयक लुम्बला, जामबे सेरीन व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रिनचिन हे उपस्थितहोते. हे शिबीर स्थानिक आमदार शिरिंग लाम्हू यांच्या मार्गदर्शन आणि साहाय्याने झाले. यात स्थानिक आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.

दुसरे शिबीर भारत आणि तिबेट सीमेलगत लष्कराद्वारा चालवण्यात येणार्‍या झेमिथांग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आले होते. यावेळी तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कप्तान यजवीर सिंग तसेच हवालदार डी. एन. शिंदे, मेजर मनोज यांनी शिबिरास भेट देऊन वैद्यकीय पथकाचे कौतुक केले, तसेच सर्व वैद्यकीय पथकाच्या कमांडिंग ऑफिसर परवेझ मुलानी यांनी सहभोजनासाठी निमंत्रित केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी तवांग मुख्य समन्वयक लुनडूप चोसांग तसेच जम्बे शिरींग यांनी अथक परिश्रम घेतले. या शिबिरातील लोकांचा प्रतिसाद पाहता शिबीर संध्याकाळपर्यंत ठेवण्यात आले. तसेच लष्करांकडून सर्व वैद्यकीय पथकास भारत तिबेट सीमेवरील ज्या मार्गिकेने १४वे तिबेटियन दलाई लामा यांचे भारतात आगमन झाले, अशा ठिकाणी भेट देण्याची संधी मिळाली. यावेळेस मराठा वॉरियर्स जंगी पलटनचे मेजर खोत यांनी या स्थानाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच या स्थानावरून १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केले व हजारो भारतीय सैन्याला हौतात्म्य पत्करावे लागले होते. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ स्मारकास भेट देऊन श्रद्धांजली वाहण्यात आली.

तिसरे शिबीर सेरू येथील माध्यमिक शाळेत आयोजित करण्यात आले होते. यावेळेस मुख्याध्यापक रिंगचिन शिरिग, चोरझोम, नीम चोइझोम, लोबसंग हे शिक्षक उपस्थितहोते. या शाळेतील आठवी ते दहावीतील विद्यार्थी, शिक्षक व जवळपासच्या नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. चौथे शिबीर किपी येथे आयोजित करण्यात आले. यावेळी जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रिंचीन तसेच संगे वांग्यू हेडमास्टर शासकीय उच्च माध्यमिक शाळा यांनी शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी चोइकयाग लामू, डोर्जी लामू, युटाँग लोमसाँग, ताशी सगे शीरिंग उपस्थित होते. या शिबिरासाठी दुर्गम क्षेत्रातील ओडुंग, वोयकर, टेमखर, बायूंग, जमखर येथील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पाचवे शिबीर हे मुख्यमंत्री पेमा खांडूजी यांच्या मतदारसंघातील जंग येथील कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. थूटांग लामू आणि डॉ. केवी मेरू यांच्या हस्ते करण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने कर्करोग निर्माण करू शकणार्‍या घातक सवयी, त्यांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि लक्षणे यांची सविस्तर माहिती दिली. सहावे शिबीर मुख्यमंत्र्यांच्या आग्रहास्तव दुसर्‍या दिवशीही जंग इथेच घेण्यात आले. याची सुरुवात शासकीय उच्च माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना कर्करोग होण्याची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय, लवकर निदान आणि उपचार याबद्दल सविस्तर माहिती दिली. या दिवशीही लाभार्थ्यांची संख्या प्रचंड होती.

अशा रीतीने असंख्य लोकांच्या प्रयत्नाने अरुणाचल प्रदेशातील हे कर्करोग जनजागृती अभियान यशस्वीरित्या संपन्न झाले.

डॉ. वैभव देवगिरकर
Powered By Sangraha 9.0