पराभवाचा राग अधिवेशनात काढू नका! पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला

04 Dec 2023 12:02:49

Narendra Modi


नवी दिल्ली :
अधिवेशनात पराभवाचा राग काढण्याऐवजी यातून शिकवण घ्यावी, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना दिला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधिवेशनाच्या आधी माध्यमांशी संवाद साधला.
 
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "लोकशाहीचे हे मंदीर जनतेच्या आकांक्षा बळकट करण्यासाठी आणि विकसित भारताचा पाया अधिकाधिक मजबुत करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. त्यामुळे मी सर्व लोकसभा खासदारांना विनंती करतो की, त्यांनी पुर्ण तयारी करुन संसदेत यावं आणि संसदेत मांडलेल्या विधेयकांवर सखोल चर्चा करावी."
 
ते पुढे म्हणाले की, "नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाबद्दल बोलायचे झाले तर विरोधकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या अधिवेशनात पराभवाचा राग काढण्याऐवजी यातून शिकवण घ्यावी. तसेच मागील नऊ वर्षांपासून चालवलेली नकारात्मक वृत्ती सोडून सकारात्मक विचारांसह पुढे गेल्यास देशाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल."
 
"प्रत्येकाचे भविष्य उज्ज्वल आहे. त्यामुळे उदास होण्याची गरज नाही. परंतु, बाहेरच्या पराभवाचा राग संसदेत काढू नका. लोकशाहीमध्ये विरोधकदेखील तेवढेच महत्त्वपुर्ण आहेत. त्यामुळे देशाला सकारात्मकतेचा संदेश द्या. तुमची नकारात्मकतेची प्रतिमा लोकशाहीसाठी योग्य नाही," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.



Powered By Sangraha 9.0