पिरामल ग्रुपकडून लीडरशिपचा शिलान्यास; दरवर्षी लाखो लीडर्सना प्रशिक्षण मिळणार

04 Dec 2023 17:24:40
Piramal School of Leadership in Jaipur

जयपूर :
पिरामल ग्रुपने राजस्थानातील जयपूरमध्ये पिरामल स्कूल ऑफ लीडरशिप सुरु करत असल्याची घोषणा केली आहे. पिरामल ग्रुपकडून जयपूर येथे लीडरशिपचा शिलान्यास करण्यात आला आहे. यात पिरामल स्कूल ऑफ लीडरशिपमध्ये पाच स्कूल्सचा समावेश असून स्कूल ऑफ एज्युकेशन अँड सिस्टम्स चेंज, स्कूल ऑफ क्लायमेट अँड सस्टेनेबिलिटी, स्कूल ऑफ हेल्थ, स्कूल ऑफ जस्टिस आणि स्कूल ऑफ इन्क्लुजन यांमार्फत दरवर्षी १,५०,००० लीडर्सना प्रशिक्षण मिळणार आहे.

दरम्यान, तब्बल ३२ एकर परिसरात विकसित करण्यात येत असलेले पिरामल स्कूल ऑफ लीडरशिप डिसेंबर २०२५ मध्ये सुरु होईल. याठिकाणी प्रशिक्षण घेत असलेल्या प्रत्येकाचा सर्वांगीण विकास घडवून आणेल असे शिक्षणाचे अनोखे केंद्र बनावे ही यामागची संकल्पना आहे. या कॅम्पसमध्ये पाच विशेष स्कूल्स असतील, ज्याठिकाणी सरकारी उपक्रमांशी निगडित महत्त्वपूर्ण विकास क्षेत्रांशी संबंधित प्रशिक्षण दिले जाईल.

पिरामल स्कूल ऑफ लीडरशिपचा शिलान्यास पिरामल ग्रुपचे चेयरमन अजय पिरामल, व्हाईस चेयरमन डॉ. स्वाती पिरामल आणि पिरामल फाउंडेशनचे सीईओ आदित्य नटराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने व्यक्ती उपस्थित होत्या. त्यामध्ये वरिष्ठ सरकारी अधिकारी, फाउंडेशनमधील युवक आणि महिला कार्यकर्ते, उद्योगक्षेत्राशी संबंधित व्यक्ती आणि विचारवंतांचा समावेश होता.
Powered By Sangraha 9.0