पराजयाचा राग हिवाळी अधिवेशनावर काढू नका : पंतप्रधान मोदींची कोपरखळी

04 Dec 2023 17:59:21
PM Narendra Modi on Opposition Parties

नवी दिल्ली :
विरोधी पक्षांनी तीन राज्यांमध्ये त्यांच्या झालेल्या पराभवाचा राग हिवाळी अधिवेशनावर काढू नये. त्यांनी आत्मपरिक्षण करून आता तरी नकारात्मक राजकारण सोडावे, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांना दिला आहे.

संसदेच्या नव्या वास्तूमध्ये दि. ०४ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनास प्रारंभ झाला. अधिवेशनापूर्वी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच लागले असून त्यात झालेल्या पराभवाचा राग विरोधी पक्षांनी संसदेच्या अधिवेशनावर काढू नये. निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवापासून विरोधी पक्षांनी बोध घेण्याची गरज असून त्यांनी आता गेल्या ९ वर्षांपासून स्वीकारलेली नकारात्मक विचारसरणी सोडून द्यावी. विरोधी पक्षांनी देशहितासाठी संसदेच्या अधिवेशनामध्ये सहभागी व्हावे. विरोधासाठी विरोध करण्याची मानसिकता अतिशय घातक असून देशाला सकारात्मकतेचा संदेश देण्यासाठी विरोधी पक्षांनीही प्रयत्न करावेत, असेही पंतप्रधान म्हणाले.

विरोधी पक्षांनी अधिवेशनाच्या कामकाजात सकारात्मक योगदान द्यावे, असे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारने दरवेळप्रमाणे यावेळीही विरोधी पक्षांसोबत चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनीदेखील सहयोगाचे धोरण ठेवावे. त्याचप्रमाणे संसदेचे अधिवेशन नव्य वास्तूमध्ये होत असल्याने व्यवस्थेमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्याकडेही सरकारतर्फे लक्ष दिले जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0