आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग उलगडणारे पुस्तक

30 Dec 2023 20:27:12
Aarthik Gunhegariche Antrang Book review
 
'फॉरेन्सिक’ हा शब्द ऐकल्यानंतर, डोळ्यासमोर एसीपी प्रद्युमन यांच्या ‘सीआयडी’ ब्युरोतील डॉ. साळुंखे येतात. चित्रविचित्र रंगांची रसायने, बर्नर वगैरे असं चित्र समोर उभं राहतं. कारण, एक पिढीच तो कार्यक्रम पाहत मोठी झाली आहे. पुढची पिढी थोडा अधिक वास्तववादी वाटावा, असा ’क्राईम पेट्रोल’ हा कार्यक्रम पाहत मोठी होतेय. त्यात बोटांचे ठसे, रक्ताचे डाग वगैरे शोधणारी अगदी सामान्य दिसणारी माणसे आहेत. पण, ’फॉरेन्सिक’ म्हणजे ’भारतीय दंड संहिते’तील खून, दरोडा, सदोष मनुष्यवध वगैरेच समोर येते. या रुढार्थाने प्रसिद्ध गुन्ह्यांच्या जोडीला आर्थिक आणि आता सायबर गुन्हेदेखील मोठ्या प्रमाणात समोर येऊ लागले आहेत. मग या आर्थिक गुन्ह्यांचा तपास नेमका कसा केला जातो? तिथे कोणत्या प्रकारचं तंत्रज्ञान, प्रणाली वापरली जाते? त्याचेच नाव ’फॉरेन्सिक अकाऊंटिंग!’
 
वर्ष २००९ मध्ये गाजलेल्या ’सत्यम कॉम्प्युटर्स’च्या घोटाळ्यात देशात प्रथमच या ज्ञानशाखेचा उपयोग केला गेला. तो घोटाळा नेमका काय आहे? गफलत नेमकी कुठे आहे? हे शोधून काढण्यात पुण्यातील फॉरेन्सिक अकाऊंटिंग एक्सपर्ट मयूर जोशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचीच चित्तथरारक कथा त्याच ज्ञानशाखेतील सर्वात तरूण तज्ज्ञ अपूर्वा जोशी यांनी ’आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग’ या पुस्तकात मांडली आहे.

अपूर्वा जोशी हे नाव आता महाराष्ट्रात, देशात परिचित झालेले. ’फॉरेन्सिक अकाऊंटिंग’ क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने, मुलाखतीही दिल्या आहेत. त्याद्वारे आर्थिक गुन्हेगारीबद्दल त्या जनजागृतीदेखील करत असतात. त्यांनी या क्षेत्रात नव्याने येऊ पाहणार्‍यांसाठी ’स्टुडंट्स हॅण्डबुक ऑन फॉरेन्सिक अकाऊंटिंग’ हे पुस्तकदेखील लिहिले आहे. त्या ’रिस्कप्रो मॅनेजमेंट कन्सल्टिंग’ या कंपनीत ’टेक्नोलॉजी अ‍ॅण्ड ड्यू डिलिजन्स’ या विभागाच्या प्रमुख आहेत.

’आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग’ या पुस्तकात मुख्य कथा जरी ‘सत्यम घोटाळा’ आणि त्याचा ’फॉरेन्सिक अकाऊंटिंग’मधून केलेला उलगडा अशी असली तरी, अपूर्वा जोशी यांनी इतिहासातदेखील उत्तम मुशाफिरी केली. त्यात स्वातंत्र्यपूर्व काळातील आद्य शेअर मार्केट घोटाळा म्हणता येईल, अशा शेठ प्रेमचंद रायचंद प्रकरण ते नुकतेच घडलेले हिंडेनबर्ग रिपोर्ट-अदानी प्रकरण यांचा धांडोळा घेतला आहे. महाराष्ट्रात दाभोळ येथील ऊर्जा प्रकल्प, राज्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेल्या ‘एन्रॉन’ कंपनीच्या अफरातफरीचा देखील विचार त्यांनी केला आहे. प्रेमचंद रायचंद हे पुढल्या काळातील मुंद्रा, दालमिया, हर्षद मेहता, केतन पारेख, रामलिंग राजू (सत्यम फेम) दीपक कोचर-चंदा कोचर, नीरव मोदी-मेहुल चोक्सी अशा घोटाळेबाजांचे परात्पर गुरू ठरतात, हेच त्यांच्या सुरस आणि चमत्कारिक कथा वाचून व्यतीत होते.

जमिनींचा हव्यास आणि त्यासाठी लेखा मांडणीत केलेली चलाखी आणि ते अंगाशी आल्यावर स्वतःहून पत्र लिहून, सत्यमच्या रामलिंग राजूने घोटाळ्याची कबुली दिली. पोलिसांच्या स्वाधीन झाले. कायदेशीर प्रक्रियेला सामोरे गेले; पण सगळेच घोटाळेबाज असे नसतात. भारतातील अनेक घोटाळेबाज आज ज्यांना ’टॅक्स हेवन’ म्हणतात, अशा देशात आहेत. त्यांना भारतात कायद्यापुढे आणण्याचे सर्व प्रयत्न सुरू आहेत.

‘फॉरेन्सिक अकाऊंटिंग’ ही ज्ञानशाखा अमेरिकेत मोठ्या प्रमाणात उपयोगात आहे. त्या शाखेत वापरले जाणारे बहुतेक ठोकताळे, नियम हे तिकडूनच आले आहेत; पण भारतीय कायदे, लेखा मांडणी आणि परीक्षणाचे नियम निराळे आहेत. अमेरिकी ठोकताळे आणि नियम भारतात तसेच्या तसे लागू पडत नाहीत. त्यासाठी मयूर जोशी यांनी आपल्या प्रचंड अभ्यासातून आपले ठोकताळे, आपले नियम तयार केले आणि हे करत असताना, त्यांना भारतातला आद्य फॉरेन्सिक अकाऊंटिंग तज्ज्ञ सापडला, तो आर्य चाणक्य!

चाणक्याने राज्यशकट हाकण्यासाठी, ’अर्थशास्त्र’ हा एक आदर्श तरीही अतिशय वास्तववादी, व्यवहार्य ग्रंथ लिहिला. या ग्रंथात आपण आधीच्या ३३ अर्थशास्त्रींची मांडणी विचारात घेऊन, त्यात आपली भर घालत, हा ग्रंथ सिद्ध करतो आहोत, हे चाणक्याने स्पष्ट केले आहे. चाणक्याने लेखा मांडणी आणि परीक्षणाच्या दृष्टीने ४० संभाव्य घटना सांगितल्या आहेत. भ्रष्टाचार, घोटाळे टाळण्यासाठी त्या टाळल्या पाहिजेत, असे स्पष्ट केले आहे. त्यात उत्पन्न प्रत्यक्ष आलेले नसताना ते आले आहे, असे नमूद करणे, उत्पन्न आधी जमा होते जे हिशेब वह्यांत नंतर लिहिले जाते, एक गोष्ट केली जाते, पण दुसरीच दाखवली जाते, अर्धवट काम करून ते पूर्ण झाल्याचे लिहिले जाते, अतिरिक्त काम करून घेऊन प्रत्यक्षात अर्धवटच दाखवले जाते, जी रक्कम भरायची आहे, ती कधी भरलीच जात नाही, अशा अनेक घटना चाणक्याने लिहून ठेवल्या आहेत. या पुस्तकात किंवा एकूणच आर्थिक गुन्हेगारीच्या क्षेत्रात, घोटाळे हे याच ४० घटनांच्या भोवताली झालेले आढळतात. यातून भारतीय विचाराचे द्रष्टेपणच दिसून येते.

भारतीय अर्थव्यवस्था जसजशी अधिकाधिक वाढत जाईल, तसतशी कंपन्यांची संख्या, उद्योग क्षेत्रे वाढत जातील. त्याचबरोबर आर्थिक गुन्हेगारीही वाढत जाणार, हे सत्य मान्य केले पाहिजे. ते रोखण्यासाठी, झाले तर त्यांचे नीट विश्लेषण करण्यासाठी ’फॉरेन्सिक अकाऊंटिंग’ ही ज्ञानशाखा अधिकाधिक विस्तारतच जाणार आहे. याचबरोबर एक गोष्ट नमूद केली पाहिजे ती अशी की, भारतात घडलेल्या प्रत्येक मोठ्या आर्थिक घोटाळ्यानंतर सरकार अधिक जागृत झाले आणि नव्या यंत्रणा उभ्या राहिल्या किंवा असलेल्या अधिक सक्षम केल्या गेल्या. मुंद्रा इत्यादी घोटाळ्यानंतर विमा क्षेत्राचे राष्ट्रीयीकरण करत, ‘जीवन विमा निगम’ उभी राहिली. हर्षद मेहता प्रकरणानंतर ‘सेबी’ अधिक सक्षम करण्यात आली. केतन पारेख प्रकरणानंतर शेअर्स डिमॅट स्वरुपात आणायची प्रक्रिया जलद झाली. दालमिया, सत्यम प्रकरणानंतर कंपनी कायद्यात अनेक सुधारणा झाल्या. ही यादी खूप मोठी आहे. यापुढे सुधारणा होण्यासाठी असा कोणताही घोटाळा होण्याची वाट बघू नये. असो.

अर्थव्यवस्था हा विषय मुळातच अनेकांना अवघड वाटणारा. त्यात आपल्यासारख्या अर्थसाक्षरता कमी असलेल्या देशात तर परिस्थिती अधिकच बिकट. पण, अपूर्वा जोशी यांचे हे पुस्तक आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग अगदी सामान्य माणसाला देखील पटकन समजतील असे आहे. सोप्या भाषेत क्लिष्ट विषय यशस्वीपणे मांडण्याबद्दल अपूर्वा जोशी यांचे अभिनंदन. हे पुस्तक प्रत्येकाने वाचलेच पाहिजे. नव्या ज्ञानशाखेची ओळख करून घेण्यासाठी, चित्तथरारक कादंबर्‍या वाटाव्या अशा सत्यकथा समजून घेण्यासाठी हे ’आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग’ वाचलेच पाहिजे.
 
पुस्तकाचे नाव : आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग ः हर्षद ते हिंडेनबर्ग
लेखिका ः अपूर्वा प्रदीप जोशी
प्रकाशक ः राजहंस प्रकाशन
पृष्ठसंख्या : १८७
मूल्य : ३०० रुपये

शौनक कुलकर्णी
९४०४६७०५९०
Powered By Sangraha 9.0