२०२४ वर्षातील मराठी कलाकारांचे नवे संकल्प!

30 Dec 2023 14:56:08


mahamtb 
 
रसिका शिंदे-पॉल
 
प्रत्येक नवी पहाट नवं चैतन्य घेऊन येते. २०२३ हे वर्ष संपत आले. या वर्षात प्रत्येकाच्या जीवनात चांगल्या-वाईट घडामोडी घडून गेल्या. फम येणारं २०२४ हे वर्ष सर्वांच्याच जीवनात नवा आनंद, उत्साह, प्रेम, संधी घेऊन येणार आहे. जुनं वर्ष संपताना या वर्षाला अखेरचा राम राम करत नव्या वर्षाचं मोठ्या उत्साहात आपण सगळेचजण स्वागत करतो. याशिवाय दरवर्षी एक नवा संकल्प करतो जो आपल्याला संपुर्ण वर्षभर अनेक आठवणी आणि शिकवण देऊन जातो. संकल्प केला म्हणजे तो पुर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती झटत असते, प्रयत्नशील असते. तर असेच काही मराठी कलाकारांनी केलेले संकल्प पाहूयात....
 
“नवीन वर्षाचे मी खुप संकल्प करायचा विचार केला आहे. त्यातला पहिला आणि महत्वाचा म्हणजे व्यायाम आणि आहारावर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे. याशिवाय अनेक प्राण्यांना मला मदत करण्याची इच्छा आहे. आणि महत्वाचं म्हणजे या २०२४ या नव्या वर्षात माझ्या आगामी नाच गं घुमा या चित्रपटाचं चित्रिकरण सुरु होत आहे, तर मला हा चित्रपट संपता-संपता याच चित्रपटाच्या पुढच्या भागाचं लिखाण करायचं आहे”.
 
- मधुगंधा कुलकर्णी, लेखिका
 

madhugandha kulkarni 
 
“नवीन वर्षाचा संकल्प मी कधीच करत नाही. कोणत्याही संकल्पासाठी नव्या वर्षाची वाट का पाहावी? ती बाब आत्ताच या क्षणी का करु शकत नाही असा मला प्रश्न पडतो. त्यामुळे मी संकल्प न करता नव्या कोणत्याही गोष्टीसाठी मुहूर्त न बघता आज करतो”.
 
- महेश मांजरेकर, अभिनेते-दिग्दर्शक
 

mahesh manjarekar 
 
 
 
“२०२४ या नव्या वर्षात अधिक वाचन करण्याचा महत्वाचा संकल्प मी केला आहे. कारण, चित्रिकरणाच्या व्यस्त कामात वाचन करणं राहून जातं आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे वर्षागणिक माझा मुलगा मोठा होत चालला आहे, त्यामुळे त्या आईपणातून किंचित माझी सुटका होत आहे, कारण तो त्याची कामं स्वत:हून करायला लागला आहे. त्यामुळे यावर्षी वाचनाला प्राधान्य देण्याचा संकल्प केला आहे.”
 
- गिरीजा ओक, अभिनेत्री
 

girija oak 
 
"खरं सांगू का मी संकल्प करणं सोडून दिलं आहे. त्याचं कारण असं की ते पाळले जात नाहीत. पण मी एक आयुष्यभराचा संकल्प केला आहे तो असा की, वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन यात समतोल राखता आला पाहिजे. कारण माझ्या जीवनात असा एक टप्पा आला होता जिथे मला असं लक्षात आलं की मी फक्त कामावर लक्ष केंद्रित करत आहे, पण घरच्यांना वेळ देण्यासाठी, फिरण्यासाठी किंवा स्वत:चे आयुष्य जगण्यासाठी वेळच काढत नाही आहे. त्यामुळे मी एका वर्षी मी आयुष्यभरासाठी हा संकल्प करुनच ठेवला आहे”.
 
- अमेय वाघ, अभिनेता
 

amey wagh 
 
“नवीन वर्षात स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष देणार आहे. याशिवाय मराठीत माझं काम सुरुच आहे पण मला अनेक हिंदी प्रोजेक्ट्स करायचे आहेत, ज्याचा श्री गणेशा मी स्टार प्लस वाहिनीवरील कहदु तुम्हे या मालिकेपासून केला असून आणखी नव्या कलाकृती हिंदीत करण्याची ईच्छा आहे”.
 
- श्वेता शिंदे, अभिनेत्री-निर्माती
 

shweta shinde 
 
“नवीन वर्षात कोणावरही अवलंबून न राहता अधिक आत्मनिर्भर होण्याचा संकल्प मी केला आहे. प्रत्येक गोष्ट स्वत:हून करण्याचा माझा मानस असणार आहे”.
 
- केतकी नारायण, अभिनेत्री
 

ketaki narayan 
“मी नवीन वर्षाचा कोणताही संकल्प केला नाही. २०२३ हे वर्ष जसं हसत, खेळत आरोग्यदायी गेलं, तसंच नवं वर्ष देखील जावं अशी इच्छा आहे”.
- उमेश कामत, अभिनेता
 
 
Powered By Sangraha 9.0